सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेली शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने चालविण्याचा निर्णय राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात उच्चस्तरीय अतितात्काळ बैठकीत घेण्यात आला. तसेच या योजनेच्या वीज बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी सदरची योजना सोलरवर चालविण्याचा निर्णय घेतला असून सदर योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे सांगोला तालुक्यातील ८१ गावांसह वाड्यावस्त्यावरील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची शिरभावीसह ८२ शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सन २०३० सालापर्यंतची सांगोला तालुक्याची लोकसंख्या गृहीत धरून दररोज २२ एमएलडी पाणी पुरवठा करण्याची क्षमता असलेली ५३४ किमीची ९९ कोटी २ लाख रुपये सुधारित खर्चाची योजना पूर्णत्वास आली. २० मार्च २०२० रोजी १५ वर्षांची मुदत संपल्याने शिरभावी योजना हस्तांतरण करून घ्यावी असे पत्र मजीप्राने जिल्हा परिषदेला पाठवले होते. त्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून या योजनेला ऊर्जितावस्था प्राप्त करून ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला.
बुधवारी मंत्रालयात झालेल्या राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या अतितात्काळ बैठकीत शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सांगोला तालुक्यातील ८१ गावासह वाड्यावस्त्यांवरील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव, जलजीवन मिशनचे मिशन संचालक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
———————————————————————
राज्यातील महायुतीचे सरकार सर्वसामान्य जनतेच्या समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी शासनाने चालविण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील जनतेमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच ही योजना सोलर वर चालविण्यातयेणार असल्याने वीज बिलाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. – आमदार शहाजीबापू पाटील