गेल्या काही दिवसांपासून सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात रात्री अपरात्री आकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत माहिती घ्यावी आणि नागरिकांना भयमुक्त करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शुक्रवार दि. ६ सप्टेंबर रोजी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील, अशोक शिनगारे, तुकाराम घेरडे, निरंजन गडहिरे, सुयश बिनवडे यांनी हे निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून सांगोला तालुक्यातील कोळा, जुनोनी, नाझरा, बलवडी, चोपडी, चिणके, घेरडी, हंगीरगे, वाकी, आलेगाव, जवळा परिसरात रात्री अपरात्री आकाशात अनेक ड्रोन घिरट्या घालत असताना निदर्शनास आले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून चोर रेकी करून चोरीची तयारी करत असल्याच्या अफवेमुळे सांगोला तालुक्यात रात्रभर महिला लहान मुले वयोवृद्ध नागरिक तसेच सर्वच नागरिक भयभीत होत आहेत. शिवाय ड्रोनच्या बाबतीत सोशल मीडियावर वेगाने पसरत असलेल्या अफवामुळे ग्रामीण भागातील जनतेत आणखी असुरक्षितता वाढू लागली आहे पोलीस निरीक्षक तसेच तहसीलदारांनी याबाबतीत वरिष्ठांशी चर्चा करून नक्की हे ड्रोन कशासाठी रात्री अप रात्री फिरत आहेत याची माहिती घ्यावी आणि अधिकृतपणे यावर खुलासा करावा असेही या निवेदनाद्वारे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नमूद केले आहे.
————————————————————
नागरिकांनी अफवांना बळी पडू नये…!
रात्री अपरात्री आकाशात घिरट्या घालणारे ड्रोन नक्की कशासाठी फिरत आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. परंतु, या ड्रोनच्या माध्यमातून रेकी करून चोऱ्या केल्या जातात ही निव्वळ अफवा आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. लवकरच याबाबतीत वरिष्ठांकडून अधिकृत माहिती घेऊन सदर ड्रोन बाबतीत योग्य तो खुलासा करण्यात येईल
मा.भीमराव खनदाळे,पोलीस निरीक्षक, सांगोला.