“उत्कर्ष विद्यालयातील मुलांनी घेतली आगळीवेगळी मुलाखत “

उपक्रमशील शाळा असणाऱ्या उत्कर्ष विद्यालयामध्ये शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय निलिमाताई कुलकर्णी यांची इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी मुलाखत घेतली . सर्वप्रथम संस्था अध्यक्षा मा . निलिमाताई व प्रशालेचे विद्यमान मुख्याध्यापक मा .कुलकर्णी सर ,प्रशालेचे पर्यवेक्षक मा . भोसले सर व मा . मिसाळ सर यांचे स्वागत करण्यात आले . यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यात आले . मा .निलिमा ताई यांनी त्यांच्या जीवनाचा प्रवास सांगितला . त्यांचा प्रेरणादायी प्रवास ऐकताना सर्व मुले भारावून गेली .
यानंतर संस्थेचे नाव माता – बालक का पडले हा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारल्यानंतर ताईंनी नागपूर अधिवेशनाचा प्रसंग सांगितला .राष्ट्रसेविकासमितीचं नागपूरला शिबिर होते,त्या शिबिराला प्रतिभाताई पुजारी गेल्या होत्या.तेथून संघाचे वरीष्ठ नेते मा.नानाजी देशमुख यांच्या भाषणाने प्रभावित होऊन…माता आणि बालकांच्या विकासासाठी ही संस्था काढली आणि म्हणूनच माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान हे नाव दिले.यामुळे मुलांची संस्थेबाबतची माहिती मिळवण्याची उत्सुकता निर्माण झाली . संस्थेची सुरूवात कोणी केली ? या प्रश्नाचे उत्तर देताना मा. निलिमाताई पुढे म्हणाल्या संस्थेची सुरुवात….प्रतिभा पुजारी,संजीवनी केळकर,नीला देशपांडे,या मान्यवरांनी केली नंतर विजयाताई देशपांडे ,निर्मलाताई देशपांडे,माधवीताई देशपांडे,माधुरीताई जोशी यांनी हे कार्य पुढे नेले.
नंतर नलिनीताई ठोंबरे,हेमाताई डबीर,वसुंधराताई कुलकर्णी , निलिमाताई कुलकर्णी …या कार्यात सहभागी झाल्या.
हळु हळु कार्यकर्त्या वाढत गेल्या आणि शिक्षणासमवेत आरोग्य , अन्याय निवारण समिती , बचत गट व जलसंवर्धन या समाजासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विविध भागांवर कार्य आपली संस्था जोमाने कार्य करु लागली .
यानंतर संस्थेची उभारणी व कार्य सांगत असताना कोणकोणत्या अडचणी आल्या व त्यावर सर्व मान्यवरांनी त्यावर चिंतन तथा मनन करून त्याचे निवारण करून हा भव्य वटवृक्ष तयार झाला हेही निलिमाताईंनी सांगितले . यानंतर ही शाळा कशी निर्माण झाली या प्रश्नावर मा . निलिमा ताई यांनी समाजातील मुले संस्कारक्षम व्हावीत व शिक्षणाबरोबर प्रत्येक समाजात माणूस घडवण्याचे शिक्षण मुलांना देण्यात यावे यासाठी प्रथम संस्कार वर्ग , बालक मंदीर व त्यानंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरू झाले आणि सन 2012 साली पालकांच्या आग्रहास्तव इयत्ता पाचवी चा वर्ग सुरू करण्यात आला हे मत व्यक्त केले .
विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकांचे निरसन माननीय निलिमाताई यांनी विविध प्रसंग सांगून केले त्याचबरोबर सातवीच्या पाठ्यपुस्तकातील “कवितेची ओळख ” या पाठाशी संबंधित कविता कशा तयार कराव्यात आशय कसा असावा आणि यमक जुळणारे शब्द कसे असावेत याबद्दलही त्यांनी माहिती सांगितली यानंतर काही मुलींनी स्वतः तयार केलेल्या कविताही त्यांच्यासमोर सादर केल्या .
यानंतर मा . कुलकर्णी सर यांनी मुलांना स्वतःच्या परिसरातील कार्यक्षम असणाऱ्या व्यक्तीची मुलाखत घेण्याचा उपक्रम मुलांना दिला .
ही मुलाखत उत्कर्ष सभागृहामध्ये घेण्यात आली होती . मुलांनी या मुलाखतीस विविध प्रश्न विचारून व कविता सादर करून छान प्रतिसाद नोंदविला .