चोरट्यांनी पळविली २ लाखांची रोख रक्कम; वाढेगावात नागरिकांमध्ये भीती
सांगोला(प्रतिनिधी):- बंद घराचे दरवाजाला लावलेले कुलूप व कडी कोयडा तोडुन घरामध्ये प्रवेश करून घरातील पत्र्याचे पेटीचा कोयंडा हत्याराने तोडुन पेटीतील रोख 2 लाख रुपये व 50 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरुन नेले असल्याची घटना वाढेगाव ता. सांगोला येथे दि.11 सप्टेंबर 2024 रोजी रात्रीच्या सुमारास घडली. चोरीची फिर्याद कमल लक्ष्मण मेटकरी (रा. वाढेगाव ) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.
चोरट्यांनी रोख 2 लाख रुपये व 50 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या एक-एक तोळ्याच्या दोन अंगठ्या, व कानातील अर्ध्या अर्ध्या तोळ्याच्य रिंगा व फुले असा एकूण 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पळवून नेला आहे.
बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 फिर्यादी कमल मेटकरी या त्यांच्या मुळ घरी महादेव गल्ली वाढेगाव ता. सांगोला येथे येवुन घरामध्ये साफसफाई करून घरामध्ये पत्त्याचे पेटीत ठेवलेले सोने व पैसे पाहून रात्रीचे 8 वा. घरास कुलूप लावुन भावाचे घरी परत गेल्या होत्या व तेथेच मुक्काम केला. त्यानंतर गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी पावणे सात वाजणेच्या सुमारास फिर्यादी यांचा भाऊ शिवाजी मेटकरी यांना शेजारी राहणारा प्रशांत गायकवाड यांनी फोन करुन तुमची आत्या कमल मेटकरी यांचे घराचा दरवाजा उघडा दिसत असुन घरातील काही सामान बाहेर पडलेले दिसत असल्याचे सांगितले. त्यानंतर लगेच फिर्यादी कमल मेटकरी व भाचा लक्ष्मण मेटकरी असे दोघे मोटर सायकल वरून फिर्यादी यांचे घरी आले. त्यावेळी घराचे दरवाजाला लावलेले कुलूप व कडी कोयडा तोडलेला दिसला. तसेच पत्र्याच्या पेटीचा कोयडा तोडुन पेटी उघडी दिसली. त्यानंतर पेटीजवळ जाऊन पाहिले असता पेटीमध्ये ठेवलेले सोने व पैसे मिळुन आले नाहीत. तसेच पेटीतील इतर साहीत्य जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यानंतर घरामध्ये जावुन पाहीले असता घरातील सर्व सामान अस्ता व्यस्त पडलेले होते. त्यामुळे चोरी झाल्याचे खात्री झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून अज्ञात चोरट्यांविरुध्द तक्रार दाखल केली आहे.