महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबतचं आ.शहाजीबापू पाटील यांचे विधान चर्चेत

“पक्षाने आदेश द्यावा, मी बेळगावात घुसून…”; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबतचं आ.शहाजीबापू पाटील यांचे विधान चर्चेत
सांगोल्यात आज दिव्यांग दिनाच्या निमित्ताने संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर आ.शहाजीबापू पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांना कर्नाटकात येण्याची परवानगी नाकारल्याबाबत विचारण्यात आले होते. यासंदर्भात बोलताना, “पक्षाने आदेश दिल्यास मी गमिनी काव्याने बेळगावात घुसून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून येईल आणि कोणाला कळूही देणार नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्-कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण तापले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गावांबाबत केलेल्या विधानानंतर हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. अशातच महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांनी बेळगावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, कर्नाटक सरकारने कायदा सुव्यवस्थेचे कारण देत स्पष्ट शब्दात नकार दिला होता. यावरून संतप्त प्रतिक्रिया येत असताना काय झाडी, काय डोंगर.. या डायलॉगमुळे फेमस झालेले आमदार शहाजीबापू पाटील यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.