सांगोला:- दुष्काळग्रस्त असणाऱ्या सांगोला तालुक्यातील वासुद -अकोला गावात ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि ग्राम परिवर्तन फाउंडेशन वासुद अकोला यांच्या सहकार्याने “एक कुटुंब एक झाड” या संकल्पनेनुसार वासुद अकोला गावात 26, 27, 28 व 29 जून रोजी भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या प्रेरणादायी संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुळात सांगोला तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. वृक्षारोपण चळवळ या तालुक्यात जोम धरू लागली आहे. झाडांचे वृक्षारोपण करून ती झाडे संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. माण नदीकाठावर वसलेल्या वासुद अकोला गावात वृक्षारोपणाचा हा सोहळा दिनांक 28 व 29 जून रोजी संपन्न होणार आहे. ग्रामस्थांच्या विशेष सहकार्याने वृक्षांची लागवड व संगोपन केले जाणार आहे.
माण नदीचे पूजन करून सदर वृक्षारोपणास सुरुवात होणार असल्याने वृक्षप्रेमींनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या उपक्रमाने इतर गावात वृक्षारोपणाची चळवळ वाढीस लागावी हा आशावाद ग्रामस्थांनी व्यक्त केला. तसेच या कार्यक्रमास सर्वांनी सहभागी होण्याचे आव्हान देखील करण्यात येत आहे.
सर्वांनी चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन गेल्यावर्षी “झाडे लावा झाडे जगवा मोहीम” यशस्वी करून एक गावचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. आपण सर्वांनी दिनांक 28 व 29 जूनला 500 वृक्षारोपणाचे व संवर्धनाचे काम यशस्वीपणे पूर्ण करूया असे आवाहन ग्रामपंचायत व ग्राम परिवर्तन फाउंडेशन कडून करण्यात आले आहे.