सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुक्याचे सरासरी रब्बी पेरणी क्षेत्र 44471 हेक्टर आहे. यामध्ये रब्बी ज्वारी 37479 हे , मका 5156 हे , गहू 822 हे , हरभरा 768 हे या प्रमुख पिकांची पेरणी केली जाते. गतवर्षी रब्बी हंगामामध्ये 42012 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. गतवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे पेरणी कमी झाली होती. यावर्षी रब्बी हंगामामध्ये 57150 हेक्टर पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये ज्वारी 36000 हे , मका 15000 हे , गहू 3000 हे , हरभरा 3000 हे , करडई 100 हे , सुर्यफुल 50 हे पेरणी चे नियोजन केले असल्याची माहिती तालुका कृषीअधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.
तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 468.3 मिमी असुन आजरोजीपर्यंत 493.8 मिमी म्हणजे 105 % पर्जन्यमान झाले आहे. यावर्षी एकंदरित पर्जन्यमान चांगले झाले आहे. शेतकरी बांधवांनी चांगला पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा पाहुन बिजप्रक्रिया करूनच रब्बी पिकांची पेरणी करावी. कृषि विभागा मार्फत रब्बी ज्वारी पिकाचे 1000 हे क्षेत्रावर प्रात्यक्षिक प्रकल्प राबविले जात आहेत. त्याचबरोबर अनुदानावरती ज्वारीचे प्रमाणित बियाणेही वाटप केले जात आहे. खरेदी विक्री संघ व शेतकी भवन सांगोला येथुन परमिट वर किंवा 7/12 व आधारकार्ड देऊन अनुदानावरती ज्वारी बियाणे उपलब्ध आहे.
रब्बी ज्वारीसाठी पेरणीपुर्वी प्रती किलो बियाणास 4 ग्रम गंधक (300 मेश पोताचे) व थायमिथाक्झाम 3 ग्रम याप्रमाणे रासायनिक बिजप्रक्रिया करावी. त्याचबरोबर 25 ग्रम अझोटोबक्टर व पि.एस.बी कल्चर प्रती किलो बियाणे याप्रमाणे जैविक बिजप्रक्रिया करावी. पेरणीसाठी सुधारित वाणांचा वापर करावा.रब्बी ज्वारी पेरणीसाठी फुले रेवती , फुले सुचित्रा , मालदांडी 35-1 , फुले वसुधा, परभणी मोती , परभणी ज्योती , परभणी क्रांती या सुधारित वाणांचा वापर करावा. बाजारामध्ये बियाणे पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. शेतकर्यांनी आधिकृत दुकाणदाराकडुनच बियाणे , खते व किटकनाशके खरेदी करावेत. दुकाणदाराकडुन पक्के बिल घ्यावे. बग व लेबल जपुन ठेवावे. बग वरिल किंमतीपेक्षा जादा रक्कम देऊ नये असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.