संपूर्ण महाराष्ट्रात विखुरला गेला असलेल्या लोणारी समाजाच्या आर्थिक उन्नती करता लोणारी समाजाचे पितामह समाज रत्न विष्णुपंत दादरे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी अशी महाराष्ट्रातील लोणारी समाजाची गेले अनेक दिवसांपासून ची मागणी प्रलंबित होती. याच मागणीच्या अनुषंगाने नुकतेच सांगोला येथे बेमुदत आमरण उपोषण सुद्धा पुकारण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेत दस्त खुद्द मंत्री महोदय नामदार अतुलजी सावे यांनी आम्हा उपोषणकर्त्यांना स्वतः भ्रमणध्वनीवरून लवकरात लवकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू असे आश्वासित केले होते. व त्या अनुषंगाने त्यांनी मंत्रालयांमध्ये बैठक देखील आयोजित केली होती. संपूर्ण महाराष्ट्रातील लोणारी समाजातील समाज बांधव हे महामंडळ स्थापन व्हावे याकरता प्रयत्नशील होते. या सर्वांच्याच प्रयत्नांना यश येऊन अखेर समाजरत्न पितामह विष्णुपंत दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मंजूर करण्यात आली आहे. याबद्दल राज्य शासनाचे सांगोला तालुका लोणारी समाजसेवा संघाच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करण्यात येत आहे.
हे महामंडळ स्थापन व्हावे याकरिता महाराष्ट्रातील सुमारे 55 आमदारांनी आपली पत्रे राज्य शासनाकडे देऊन या मागणीस पाठिंबा दिला होता. आमदार जयकुमार गोरे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार राम सातपुते यांनी विधिमंडळामध्ये देखील ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी रेटून धरली होती. सांगोला येथे पार पडलेल्या अधिवेशनादरम्यान आमदार जयकुमार गोरे व गोपीचंदजी पडळकर हे स्वतः येऊन या मागणीसाठी आम्ही पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याचबरोबर सांगोला तालुक्यातील सर्वच नेते मंडळी यांनी ही या साठी प्रयत्न केले होते. महाराष्ट्रातील बहुतांश आमदार महोदय मंत्री महोदय आणि लोणारी समाजाच्या एकजुटीचा हा निर्णायक विजय झाला असून हे महामंडळ स्थापन झाल्यामुळे लोणारी समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे ज्या ज्या राजकीय सामाजिक व अराजकीय नेतेमंडळी तसेच सर्व समाज बांधवांनी केलेल्या समर्पित व निरपेक्ष भावनेने केलेल्या कार्याची फलश्रुती म्हणून हे महामंडळ आज स्थापन झाले आहे याचा तमाम महाराष्ट्रातील लोणारी समाज बांधवांना मनस्वी आनंद होत आहे. व राज्य शासनाने या मागणीची दखल घेऊन या समाजास न्याय देण्याची भूमिका घेतली त्याबद्दल सांगोला तालुका लोणारी समाजसेवा संघाच्या वतीने राज्य शासनाचे मनस्वी आभार.