महाराष्ट्र

अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन, विक्रमी गर्दी, प्रचंड जल्लोष आणि ढोल ताशांच्या गजरात महाविकास आघाडी कडून दिपकआबांचा उमेदवारी अर्ज दाखल 

सांगोला : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्याचे नेते माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासातील ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आणि रेकॉर्डब्रेक शक्तीप्रदर्शन करून महाविकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुमारे ३० ते ३५ हजार दिपकआबा प्रेमी शिवसैनिकांनी सांगोला शहरात गर्दी केली होती. संपूर्ण विधानसभा मतदारसंघातून वाहनांचे लोंढेच्या लोंढे शहरात दाखल झाल्याने संपूर्ण सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यावर ट्राफिक जाम झाल्याचे चित्र सोमवारी दिवसभर पाहायला मिळाले. 
प्रचंड जल्लोष ढोल ताशांचा कडकडाट आणि उत्साहात महात्मा फुले चौक येथून माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली सुरू झाली. विशेष म्हणजे रॅलीतील सर्वात पुढे असणारे लोक सांगोला तहसील कार्यालयात पोहोचले तरीही रॅलीमध्ये सहभागी असणारे लोक अजूनही महात्मा फुले चौकातच होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांसह मित्र पक्षाच्या वतीने महाविकास आघाडी कडून सोमवार दि २८ रोजी दिपकआबांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी बहीरप्पा माळी यांच्याकडे दाखल केला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके घेरडी गावचे माजी सरपंच धनगर समाजाचे युवा नेते बिरा पुकळे आणि शिवसेना महिला आघाडीच्या सुरेखा सलगर आदी उपस्थित होते. 
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जयभवानी चौक येथे या रॅलीचे जाहीर सभेत रुपांतर झाले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव, संभाजीराजे शिंदे, प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, शिवाजीराव बनकर, अभिषेक कांबळे, संभाजी हरिहर, तुषार इंगळे, अक्षय चोरमुले, अजित देवकते, संतोष पाटील, नवनाथ मोरे, अनिल नवत्रे, सखुबाई वाघमारे आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासासाठी २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील या वारकरी सांप्रदायाचा आणि निस्सीम निस्वार्थी सेवेचा वारसा लाभलेल्या उमेदवाराला विजयी करून राज्यातील सत्ताधाऱ्यांना हद्दपार करण्याचे उपस्थितांना आवाहन केले. 
—————————————–
 शेवटच्या श्वासापर्यंत विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
यंदाची विधानसभा निवडणूक सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनतेनेच हातात घेतली आहे. महाविकास आघाडीकडून मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिली आहे. मी हाती मशाल घेतल्यापासून दररोज माझ्याकडे नवीन लोंढे शिवसेना परिवारात दाखल होत आहेत. फक्त एका हाकेवर ८ ते १० हजार महिला आणि हजारोंच्या संख्येने माझ्यावर आणि शिवसेनेवर तसेच महाविकास आघाडीवर प्रेम करणाऱ्या ३० ते ३५ हजार कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. आजवर केलेल्या प्रामाणिक कामाची हीच खरी पोहोच पावती म्हणावी लागेल. सांगोलकरांचे प्रेम आणि विश्वास पाहून खरोखर मी भारावून गेलो आहे. माझ्याकडे वारकरी संप्रदायाचा वारसा आणि सेवेचा वसा आहे. सांगोलकरांच्या प्रेमाला आणि विश्वासाला शेवटच्या श्वासापर्यंत तडा जाऊ देणार नाही.
; दिपकआबा साळुंखे पाटील 
उमेदवार, महाविकास आघाडी 
२५३ सांगोला विधानसभा मतदारसंघ
—————————————–
काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचाही  दिपकआबांना बिनशर्त पाठिंबा..! 
सांगोला विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांनी नुकतीच बैठक घेऊन सर्वानुमते महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष डॉ. धनंजय पवार यांनीही जाहीर सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा दिपकआबांना पाठिंबा जाहीर केला. आबांना पाठिंबा देण्याचा निर्णय आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना विश्वासात घेऊनच घेतला असल्याचेही डॉ. धनंजय पवार यांनी जाहीर केले.
—————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button