स्व.गणपतराव देशमुख यांच्यामुळेच सांगोला तालुक्याचा विकास झाला आहे- मा.सभापती बाळासाहेब काटकर
वाकी (शिवणे) येथे शेकापची कॉर्नरसभा संपन्न; तरुणांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
सांगोला(प्रतिनिधी):-स्व.गणपतराव देशमुख यांच्यामुळेच सांगोला तालुक्याचा विकास झाला आहे. गेल्या काही वर्षात सांगोला तालुक्यातील विकासाची गंगा थांबलेली आहे. ती विकासाची गंगा पुढे घेऊन जायची असेल तर शेकापच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा,असे सांगत सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ.बाबासाहेब देशमुख यांना विधानसभेत पाठवूया,असे आवाहन माजी सभापती बाळासाहेब काटकर यांनी केले.
सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ वाकी शिवणे येथे भव्य कॉर्नरसभा संपन्न झाली. यावेळी माजी सभापती बाळासाहेब काटकर बोलत होते.व्यासपीठावर डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख यांच्यासह मित्रपक्षाचे व शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले की, सांगोला मतदारसंघात अनेक विषय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत. गेल्या 5 वर्षात सत्ता असूनही यांना पाणी तसेच रस्ते, शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही.सांगोला मतदार संघाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून हा मतदार संघ विकसीत करण्यासाठी आणि येथील समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले की, डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यानी सोशल मिडीया, फेसबुक आणि जनसंपर्क याचा वापर करुन तळागाळातील जनतेपर्यंत पोहचून डॉ.बाबासाहेब देशमुख यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन केले.
डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे समर्थन आणि आशीर्वाद पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे अतिशय साधेपणामुळे सांगोला विधानसभा मतदार संघातील जनतेलाही परिवर्तन हवे आहे, गुंडगिरी, दादागिरीतून मुक्त होण्यासाठी आणि गेल्या 5 वर्षात गोरगरीबांच्या प्रत्येक कामात टक्केवारी घेणार्यांना घरी बसविण्यासाठी शेकापला साथ देण्याचे आवाहन करून 20 तारखेला शिट्टी या चिन्हाला मत देऊन परिवर्तन घडवण्याचे आवाहन सर्वांकडून करण्यात येत आहे.