सांगोला तालुका

कासाळगंगा प्रकल्प लागलाय बोलू ! नदी संवाद यात्रेसाठी एकवटा अवघा गाव

महूद बुद्रूक (ता. सांगोला) : राष्ट्रीय जल पुरस्कार विजेता कासाळगंगा प्रकल्प बोलू लागलायं. निमित्त होते, महाराष्ट्र शासनाच्या ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमातंर्गत आज झालेल्या निबंध, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचे. लोकसहभागातून पंढरपूरच्या चंद्रभागा नदीची उपनदी झालेल्या कासाळगंगा पुनर्जीवित प्रकल्पामुळे काय फायदे झाले आहेत, याविषयी विद्यार्थी व्यक्त झालेत. त्याचप्रमाणे समाजाला नदीशी जोडण्यासाठीच्या नदी संवाद यात्रेसाठी अवघा गाव एकवटा होता. नदी संवाद यात्रेच्या अनुषंगाने कटफळ, चिकमहूद, महूद बुद्रूक (ता. सांगोला) येथे काढण्यात आलेल्या प्रभात फेऱ्यांमधून ‘जल है जीवन’, ‘जल है तो कल है’, असा जयघोष करत परिसर दुमदुमून सोडण्यात आला.
कासाळगंगाचे उगमस्थान असलेल्या कटफळ (ता. सांगोला) नदी संवाद यात्रेचा शुभारंभ सांगोला तहसिलदार अभिजित पाटील यांच्या हस्ते झाला. तसेच पुण्याच्या ‘यशदा’चे माजी संचालक डॉ. सुमंत पांडे, पुण्याचे पर्यावरण तज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांनी जगण्याशी आवश्‍यक असलेले शाश्‍वत पाणी, पर्यावरण याबद्दल उपस्थितांशी संवाद साधला. नदी संवाद यात्रेच्या माध्यमातून कासाळगंगा प्रकल्पामध्ये डॉ. पांडे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. कासाळगंगा समन्वयक बाळासाहेब ढाळे यांनी कासाळगंगा अविरल, निर्मळ वाहण्यासाठी सगळ्यांनी एकजूट दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कटफळचे सरपंच दादासाहेब कोळेकर, उपसरपंच नारायण बंडगर, ग्रामसेवक बी. ए. नरळे, मुख्याध्यापक एम. बी. बंडगर, बाळासाहेब पाटील, दत्तात्रय पाटील, शहाजी खरात, बापू चव्हाण, दीपक धांडोरे आदी उपस्थित होते.
चिकमहूद (ता. सांगोला) येथे विद्यार्थ्यांनी नदी संवाद यात्रेतंर्गत प्रभात फेरी काढली. तसेच कलश पूजनावेळी हळदी-कुंकूचा कार्यक्रम झाला. याही गावात निबंध, रांगोळी, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. सरपंच सुशिला पंढरी कदम, उपसरपंच आक्काबाई कालिदास भोसले, सुरेश कदम, बाळासाहेब भोसले, संजय पाटील, जगन्नाथ तांबवे, तलाठी तनमोरे, ग्रामविकास अधिकारी आत्माराम कोळी, शंकर मेटकरी, कृषी विभागाचे निवृत्त अधिकारी शशिकांत महामुनी, अभियंता अनिकेत महाजन, धोंडीबा बंडगर, बंडगर पैलवान, वैद्यकीय अधिकारी खांडेकर, काशिलिंग शेळके, मंडल कृषी अधिकारी अभंग, कृषी पर्यवेक्षक जाधव, कृषी सहाय्यक वाघमोडे, पंढरी भोसले, रवींद्र कदम, कालिदास भोसले, देवदत्त भोसले, मुख्याध्यापक दिघे, मुख्याध्यापक नागेश देशमुख, मृदसंधारण अधिकारी कुलकर्णी, जिल्हा परिषद बांधकामचे थिटे, वनविभागाच्या अधिकारी इंगोले आदी उपस्थित होते.
कासाळगंगा पुनर्जीवनाची लोकसहभागातून मुहूर्तमेढ रोवत ‘महूद पॅटर्न’ म्हणून देशभर आपली ओळख निर्माण केलेल्या महूद बुद्रक (ता. सांगोला) गावातील नदी संवाद यात्रेच्या आनंदोत्सवात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हा परिषद शाळा आणि रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात निबंध, चित्रकला, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह हे नेहमी समाजाला नदीशी जोडा हे नेहमी सांगतात. त्याचा प्रत्यय स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी कासाळगंगाचे फायदे या विषयावर साकारलेल्या कलाकृतीतून आला. सांगोला गटविकास अधिकारी आनंद लोकरे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, सरपंच संजीवनी लुबाळ, उपसरपंच वर्षा महाजन, संजय पाटील, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शिंदे, शंकर मेटकरी, समन्वयक बाळासाहेब ढाळे, आर. डी. देशमुख, माजी उपसरपंच दिलीप नागणे, लिंगदेव येडगे, संतोष पाटील यांच्यासह वन, बांधकाम, कृषी, मृदसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कलश आणि जलपूजनाचा कार्यक्रम झाला.
कासाळगंगाचा पर्यावरणीयदृष्ट्या अभ्यास
कासाळगंगा प्रकल्पाचा पर्यावरणीय दृष्ट्या डॉ. गोखले आणि डॉ. पांडे यांनी कटफळपासून सुरु केला. त्यानंतर चिकमहूद आणि नंतर महूद येथे कासाळगंगा परिसराची पाहणी केली. दुपारनंतर पंढरपूर तालुक्यातील गावांमध्ये अभ्यास झाल्यावर दोघेही महूद बुद्रूकमध्ये परत आलेत. महूद बुद्रूकमध्ये कासाळगंगा प्रकल्पातंर्गत समाविष्ट असलेल्या २३ गावे आणि वाड्यांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि समन्वयक यांची डॉ. पांडे व डॉ. गोखले यांच्यासमवेत बैठक झाली. त्यामध्ये कासाळगंगा अविरल आणि निर्मळ वाहण्यासाठी काय उपयायोजना करायला हव्यात याबद्दल विचारविनिमय करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!