राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमास अन्नदान व स्वेटर वाटप कार्यक्रम संपन्न

कडाक्याच्या थंडीत आ. शहाजी बापू पाटील यांच्या कडून वृद्धांना मायेची उब
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या 425 व्या जयंतीचे औचित्य साधून आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम येथे भेट देऊन तेथील वृद्ध नागरिकांना भोजन व कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी स्वेटर वाटप तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
या कार्यक्रमास राजलक्ष्मी ताई पाटील, मा. पंचायत समिती सदस्य वंदना गायकवाड, शोभा काकी देशमुख, सिमा इंगवले, पुनम सावंत, करुणा जांगळे, दिपाली माने, राणीताई चव्हाण, विद्या पवार, गायकवाड यांसह इतर महिला उपस्थित होत्या.
सांगोला शहरांमध्ये मागील चार वर्षापासून सुरू असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमामध्ये सध्या सहा महिला व दोन ज्येष्ठ नागरिक अशा एकूण आठ वृद्धांचा समावेश आहे. या ठिकाणी सदरचे वृद्ध नागरिक हे विविध तालुक्यांमधून व विविध कारणास्तव घराबाहेर पडलेले असून यांना सांभाळण्यासाठी सध्या कोणीही तयार नसल्याने सांगोला तालुक्यातील युवकांनी अशा वृद्धांसाठी निवारा उपलब्ध करून दिला आहे. या ठिकाणी कत्तलखान्याकडे नेल्या जाणाऱ्या 11 खिलार जातीच्या गाईंची देखील देखभाल सदर वृद्धाश्रमाच्या वतीने केली जाते. मातोश्री वृद्धाश्रमाद्वारे गाय व माय यांची सेवा असे कार्य सध्या सुरू आहे.
ज्या नागरिकांना आपल्या पाल्यांनी आश्रय न देता घराबाहेर काढले अथवा इतर काही कारणास्तव घराबाहेर पडलेल्या या ज्येष्ठ नागरिकांना आश्रय देऊन मातोश्री वृद्धाश्रमाने अत्यंत पुण्यस्पद कार्य केले आहे. समाजातील इतर नागरिकांनी देखील या कार्याचा आदर्श घेणे गरजेचे आहे. वृद्धाश्रमातील नागरिकांना कधीही कोणतीही समस्या जाणवली तर आमदार शहाजी बापू पाटील यांच्या वतीने आम्ही सर्वजण कायम या वृद्ध नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असू.
राजलक्ष्मीताई पाटील.