सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न.
सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलची दोन दिवसीय शैक्षणिक सहल मोठ्या उत्साहात पार पडली.ही सहल सोमवार दि. 6/1/2025 व मंगळवार दि. 7/1/2025 अशी दोन दिवसांची होती यामध्ये ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी देण्यात आल्या.
पहिल्या दिवशी उपस्थित पालकांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले.सकाळी ठीक ६ वा. विद्यालयातून प्रस्थान झाले. सुरूवातीला ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले तसेच पुढे वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असलेल्या ढोल्या गणपतीचे दर्शन घेतले. संथ वाहणारी कृष्णा नदी, पुरातन मंदिर, सुंदर आणि रेखीव कळस हे मनाला भारावून टाकणारे होते. यानंतर विद्यार्थी व शिक्षकांनी भोजनाचा आस्वाद घेतला व पुढे ही सहल प्रतापगडाचे दर्शन घेण्यासाठी पोहचली व किल्ल्याविषयी माहिती जाणून घेतली.यानंतर रात्री पाचाड येथे रात्रीचे जेवण व मुक्काम करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण रायगड दर्शन घेण्यासाठी गेले.गडावर पोहचल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘छ. शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणा दिल्या व तेथील मेणा दरवाजा, पालखी दरवाजा, हत्ती तलाव तसेच छ. शिवरायांची सिंहासनाची जागा म्हणजेच राजसभा, महादरवाजा, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर या ठिकाणांची माहिती घेत व शेवटी छ. शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले. रायगडावरुन परतल्यानंतर दुपारचे जेवण करून पुढे समतेचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट दिली. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहाची माहिती घेतली व त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेऊन महाबळेश्वर या ठिकाणी भेट दिली व त्यानंतर रात्रीचे जेवण घेऊन ही सहल सुखरूप सांगोला येथे पोहचली.
ही सहल यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका कु. शिल्पा ढाळे, सुकेशनी नागटिळक, विभाग प्रमुख श्री. संगमेश्वर घोंगडे, श्री. संतोष बेहेरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.