सांगली- परळी गाडीस आयसीएफ कोच जोडावेत:-अशोक कामटे संघटना
सांगोला (प्रतिनिधी)सांगली-मिरज -परळी या रेल्वेस आयसीएफ कोचस जोडावेत अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सोलापूर यांच्याकडे केली आहे.
सध्या या गाडीस डेमो अर्थात पैसेंजर गाड्यांचे डबे जोडण्यात आले आहेत सांगलीतून परळीपर्यंत तब्बल 455 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे डबे सोईचे नाहीत. शिवाय हा प्रवास रात्रभर 10 तासांचा असल्यामुळे प्रवाशांची हेळसांड होत आहे सध्या गाडीस प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मात्र अनेक वर्षापासून या गाडीतील डब्यांची रचना आणि बैठक व्यवस्था बदलण्यास रेल्वे प्रशासन टाळाटाळ करत आहे या गाडीला तिकीट एक्सप्रेसचे मात्र रचना पॅसेंजरची असल्यामुळे फक्त तिकीट दर वाढवल्याने प्रवाशांना आर्थिक भार दंडवत बसत आहे. तसेच हा प्रवास रात्रीचा असल्याने सुरक्षितता हा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला आहे. काही दिवसांपूर्वीच कुर्डूवाडी परिसरात वंदे भारत, चेन्नई एक्सप्रेस या एक्सप्रेस वर दगडफेक करण्यात आली या पुढील काळात सुरक्षितता म्हणून या रेल्वेस एक्सप्रेसचे कोच व गार्डची नेमणुक हा बदल अमलात आणावा अशी मागणी शहीद अशोक कामटे संघटनेने यापूर्वी केली होती आताही स्मरणपत्राद्वारे मागणी केली आहे.
वास्तविक ही गाडी नांदेड विभागाच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे पुणे, सोलापूर व नांदेड विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. या तिन्ही विभागांच्या समन्वयाअभावी गेल्या अनेक वर्षापासून प्रवाशांना रात्रभर ताटकळत प्रवास करावा लागत आहे. सध्या चांगली उत्पन्न देणारी परळी गाडी सांगली, मिरज ,कोल्हापूरसह नजीकच्या कर्नाटक राज्यातून सोलापूर ,पंढरपूर, सांगोला ,लातूर धाराशिव ,बीड येथे जाण्यासाठी प्रवाशांच्या सोयीचे आहे ही गाडी सांगलीतून रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी सुटत असल्यामुळे प्रवाशांना रात्रभर जागून हा प्रवास पूर्ण करावा लागत लागतो सध्या रेल्वे कडून अनेक एक्सप्रेस गाड्यांचे आयसीएफ मधून रुपांतर करण्यात येऊन नव्या एलएचबी कोच जोडल्या जात आहेत त्यामुळे या गाड्यांची आयसीएफ कोच सांगली -परळी गाडीमध्ये वापरून प्रवास सुखकर करण्याची मागणी प्रवाशांनी अशोक कामटे संघटनेकडे केली आहे पहिल्या टप्प्यात आयसीएफ कोच जोडून परळी गाडी सुरू करावी अशी मागणी शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
—————————————————-
सांगली- परळी या गाडीस पंढरपूर, कुर्डूवाडी ,सांगोला या सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे तसेच परळीकडे जाताना मध्यरात्री आणि सांगली, मिरजेकडे येताना ती दिवसा धावते यासाठी गाडीची रचना बदलून जुने डेमो डबे हटवून त्याजागी एलएचबी पद्धतीचे नवीन डबे जोडावेत यातून रेल्वेचे उत्पन्न वाढेल प्रवाशांचा प्रवासातील नाहक त्रास कमी होईल आणि गाडी निश्चित वेळेत पोहोचेल .
नीलकंठ शिंदे सर, संस्थापक अध्यक्ष शहीद अशोक कामटे संघटना सांगोला.