एस.टी बसला धडकल्याने तिप्पेहळ्ळी पाटी येथे एका अनोळखी इसमाचा मृत्यू
सांगोला(प्रतिनिधी):- विरूध्द दिशेने येऊन एस.टी ला समोरून धडकल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला असल्याची घटना गुरुवार दि.16 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजणेचे सुमारास सांगोला तालुक्यातील तिप्पेहळ्ळी पाटी घडली.अपघाताची फिर्याद बस चालक महादेव बाळु बंडगर (रा.रीळे ता. शिराळ जि.सांगली) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.
काल गुरुवार दिनांक 16 जानेवारी रोजी फिर्यादी हे शिराळा डेपो येथुन सकाळी 8 वाजता शिराळा ते अक्कलकोट अशी एस.टी बस घेवुन शिराळा येथुन अक्कलकोट येथे जाणेस निघाले होते. सदर बस इस्लामपुर, सांगली, मिरज मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 वरून सांगोल्याकडे येत असताना तिपेहळ्ळी पाटी येथे दुपारी 12.30 वा.चे सुमारास आली असता समोरून विरूध्द दिशेने एक मोटार सायकल स्वार येवुन समोरून एस.टी बसच्या डाव्याबाजुला धडकुन खाली पडला. यावेळी त्वरीत बस चालक व वाहक यांनी तात्काळ 108 अँम्बुलन्सला फोन केला. थोड्यावेळ्यात त्या ठिकाणी 108 अँम्बुलन्स आली असता त्यातील डॉक्टरांनी खाली उतरून जखमी इसमास तपासुन तो मयत झाला असे सांगितले.दरम्यान पोलीसांनी खाजगी वाहन करून मृत इसमास ग्रामीण रूग्णालय सांगोला येथे आणुन दाखल केले आहे. मयत इसमाच्या नाव पत्त्याबाबत चौकशी केली परंतु त्यांचा नाव पत्ता माहित झाला नसुन तो अनोळखी पुरूष जातीचे वय अंदाजे 50 वर्षे असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.



