अनिष्ट प्रवृत्तीकडून जिल्ह्यातील सहकाराला जाणीवपूर्वक बदनामीचे ग्रहण ; दिपकआबा साळुंखे पाटील

सोलापूर जिल्हा हा राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. यामध्ये अनेक कारखाने सहकारी तत्त्वावर सुरू आहेत कारखान्याबरोबरच जिल्ह्यात अनेक नामवंत संस्था सहकारी तत्त्वावर चालत आल्या आहेत परंतु सध्या जिल्ह्यातीलच काही अनिष्ट प्रवृत्तींकडून सहकाराला बदनामीचे ग्रहण लावले जात असल्याचा खुलासा सांगोला सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केला आहे. सध्या सांगोला सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून आपल्यावर जे काही आरोप होत आहेत ते तथ्यहीन असून हा प्रकार म्हणजे शिळ्या कढीला पुन्हा ऊत आणल्यासारखे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरवर्षी साखर कारखान्याचे नियमाप्रमाणे लेखापरीक्षण केले जाते. त्यानुसार प्रत्येकवर्षी सांगोला सहकारी साखर कारखान्याचे लेखापरीक्षण अर्थात ऑडिट सबंधित विभागाला सादर केलेले आहे. कारखान्याची साखर ही नियमाप्रमाणेच विक्री केल्याने यामध्ये कुठेच गैरव्यवहार झाला नाही. सुमारे १० ते ११ वर्षे साखर कारखाना बंद अवस्थेत असूनही या संस्थेचे नियमितपणे लेखापरीक्षण सादर केलेले आहे त्यामुळे सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या कारभारात गैरव्यवहार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असेही यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका हा पिढ्यानपिढ्या दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. जिथे प्यायला पाणी नव्हते अशा तालुक्यात आम्ही ३० वर्षापूर्वी सहकारी तत्त्वावर साखर कारखाना उभा केला. त्याकाळात पाण्याची कमतरता असल्याने हा कारखाना फार काळ चालू शकला नाही. त्याचबरोबर शेजारील आटपाडी, कवठे महांकाळ, जत, मंगळवेढा या तालुक्यातही अशीच परिस्थिती असल्याने शेजारील तालुक्यातही ऊस उपलब्ध नव्हता त्यामुळे अशा दुष्काळी तालुक्यात साखर कारखाना चालवणे हे अत्यंत जिकिरीचे काम होते. तरीही संचालक मंडळाच्या सहकार्याने आणि सभासद शेतकऱ्यांच्या साथीने अनेक वर्षे हा साखर कारखाना आपण चालवला परंतु लांबून ऊस वाहतूक करून हा कारखाना चालवणे शक्य नसल्याने सर्वांना विश्वासात घेऊनच हा कारखाना बंद करण्याचा आपण सर्वानुमते निर्णय घेतला होता. केवळ हा कारखाना बंद अवस्थेत राहिल्यानेच कारखान्यावर असलेला कर्जाचा बोजा वाढत गेला त्यामुळे संचालक मंडळ अथवा व्यवस्थापकीय मंडळ यांचा कुणाचाही दोष नाही. हा कारखाना ११ वर्षे बंद अवस्थेत होता काळानुरूप सांगोला आणि शेजारील दुष्काळी तालुक्यात शेतीच्या पाण्याच्या अनेक योजना मार्गी लागल्याने पुन्हा या परिसरात ऊस लागवडी खालील क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली यानंतर आपण सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन पुन्हा हा साखर कारखाना सध्या माढा तालुक्याचे आमदार असलेल्या अभिजीत (आबा) पाटील यांना चालविण्यासाठी दिला. सध्या हा कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू असून कारखान्याच्या संबंधित आपल्यावर होत असणारे आरोप हे पूर्णतः तथ्यहीन आणि बिन बुडाचे आहेत असा खुलासाही शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केला.
———————————-
बंद अवस्थेत असताना कारखाना तळ हातातील फोडाप्रमाणे जपला…!!!
११ वर्ष साखर कारखाना बंद अवस्थेत होता या काळात स्वतःच्या खिशातील पैसे देऊन या कारखान्यासाठी स्वतंत्र सुरक्षारक्षक नेमले होते. कारखाना बंद अवस्थेत असताना या कारखान्यातील एक नटही बाहेर जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. तरीही ज्यांना कधी सहकारी संस्थेचे संचालकही होता आले नाही अशा लोकांनी राजकीय नैराश्यातून हा कारखाना आपण विकला असल्याचे आरोप अनेकवेळा आपल्यावर केले होते. साखर कारखाना म्हणजे सभासदांचे मंदिर आहे याची आपणास जाणीव होती. म्हणूनच, हा कारखाना आपण तळहातातील फोडाप्रमाणे जपला म्हणूनच ११ वर्षे बंद असणारा कारखाना केवळ एका महिन्यात सुरू झाला. कारखान्यातील एक नटही कुठे हलविला नव्हता हे कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन सोहळ्यात खुद्द अभिजीत आबा पाटील यांनीच स्पष्ट केले होते.
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील
चेअरमन सांगोला सहकारी साखर कारखाना