महाराष्ट्र
आंतराष्टीय परिषदेमध्ये प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या कार्याचा गौरव; प्रा.धनाजी चव्हाण यांनी सादर केला शोधनिबंध

सांगोला ( प्रतिनिधी ) ब्रिक्स वल्ड ऑफ ट्रेडिशन्स मॉस्को रशिया,सरहद महाराष्ट्र पुणे व स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे यांचे सयुक्त विद्यमाने व सरहद पुणे, आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त ९८ कार्यक्रमांच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषद ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सरहद महाविद्यालय,पुणे येथे संपन्न झाली. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल मधील विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचे जागतिक योगदान’ या विषयानुसार सांगोला तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रातील अमोघ व्यक्तित्व आदरणीय प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या समाजकार्याविषयी प्रा. धनाजी चव्हाण यांनी शोधनिबंध सादर केला.
यावेळी व्यासपीठावर महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मॉरिशसच्या डॉ.मधुमती कुंजल मॅडम, मा.विश्वदीप कुंजल, सरहद पुणे संस्थापक अध्यक्ष मा.संजय नायर, सचिव मा.सुषमा नायर, स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे प्रमुख डॉ. स्नेहल तावरे उपस्थित होते. पहिल्या सत्रात उद्घाटन, परिषदेसाठी सादर केलेल्या शोध निबंधाच्या ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.यावेळी मान्यवरांनी परिषदेच्या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शन केले.तसेच दुसऱ्या सत्रात प्राध्यापक,संशोधक विद्यार्थी यांनी शोधनिबंध सादर केले.
यामध्ये प्रा.धनाजी चव्हाण यांनी सादर केलेल्या ‘ आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेच्या माध्यमातून समाजहितासाठी कार्य करणारे अमोघ व्यक्तित्व- प्रा. प्रबुद्धचंद्र झपके’ या शोधनिबंधातून प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या समाजकार्यातील वेगळेपण,विशेषता, कार्यकर्तृत्वता विषद करत त्याच्या अमोघ कार्याचा गौरव केला.
या परिषदेसाठी प्राध्यापक,संशोधक विद्यार्थी, सरहद महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.