खिलारवाडी येथे चोरी; १६ तोळे सोन्यासह दीड लाख रुपये रोख रक्कम असा ६ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

सांगोला (तालुका प्रतिनिधी): अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा उघडून कपाटातील १६ तोळे सोन्यासह दीड लाख रुपये रोख रक्कम असा ६ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना खिलारवाडी ता सांगोला येथे घडली आहे. याप्रकरणी आनंदराव रामचंद्र होळकर यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, खिलारवाडी ता. सांगोला येथील आनंदराव रामचंद्र होळकर यांचे आशीर्वाद किराणा स्टोअर्स नावाचे किराणा तसेच जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. राहते घराचे बाजुस लागून किराणा दुकान असून जुन्या घरातील लोखंडी कपाटात नेहमीप्रमाणे सोने तसेच रोख रक्कम ठेवत होते. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त गावात रात्री डान्स स्पर्धा असल्यामुळे मुलगा सोमनाथ याने दुकान रात्री ११.४५ वा. पर्यंत सुरू ठेवले होते. २० फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता आनंदराव होळकर हे दुकानात जाण्यासाठी निघाले असता, दुकानाचा मागील लाकडी दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे त्यांनी आत जावून पाहिले असता असता, आतल्या खोलीतील दोन्ही लोखंडी कपाटाचे दरवाजे उघडे दिसून आले. खोलीमध्ये कपाटातील सर्व साहीत्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कोणीतरी अज्ञात चोराने रात्रीच्या सुमारास घराच्या मागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरी केल्याची खात्री झाली.
अज्ञात चोरट्याने आनंदराव होळकर यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून कपाटातील २ लाख १० हजार रुपये किमतीचे ७ तोळ्याचे तीन गंठण, ३० हजार रुपये किमतीची १ तोळ्याची सोन्याची बोरमाळ, ९० हजार रुपये किमतीच्या ३ तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या, ३० हजार रुपये किमतीचे १ तोळ्याचे सोन्याचे कर्णवेल व सोन्याचे झुमके, १२ हजार रुपये किमतीच्या भेट आलेल्या सोन्याच्या लहान अंगठया व नथ, ६० हजार रुपये किमतीच्या २ तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या, ६० हजार रुपये किमतीच्या ल सोन्याच्या २ तोळ्याच्या २ चैन, ५ हजार रुपये किमतीचे चांदीचे जोडवे व चांदीचे तसेच १ लाख ५० हजार रुपये रोकड असा ६ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.