महाराष्ट्र
सांगोला येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण

नाझरा( प्रतिनिधी):- सध्या शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारच्या नावीन्यपूर्ण संकल्पना येत आहेत.विविध प्रकारच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक अपडेट होणार आहेत.विद्यार्थ्यांचा भावनिक,सामाजिक त्याचबरोबर शैक्षणिक विकास साधण्याकरिता शिक्षकांनी अध्यायवत होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वेळापूर येथील ज्येष्ठ अधिव्याख्याते सुभाष बुवा यांनी केले.
सांगोला येथील गीताबाई बनकर विद्यालयात गेली तीन दिवस झाले शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणात प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष बुवा बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की या प्रशिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020,राज्य अभ्यासक्रम आराखडा,समग्र प्रगतीपत्रक,क्षमता आधारित मूल्यांकन,अध्ययन अध्यापन प्रक्रिया, मूल्यांकनाची कार्यनीती, प्रश्न निर्मिती प्रकार व कौशल्य, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आदी घटकांवर विस्तृत मार्गदर्शन केले जाणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये हनुमंत घाडगे,आकाश बिले,प्रेमचंद हातागळे, वसंत शिंदे, बालाजी चोपडे,कृष्णदेव शिंदे,सुधीर वसेकर,नागेश लवटे, विजयानंद कावळे,मंगळ घोळवे, विजयसिंह घाडगे,नवनाथ शेळके,एस.डी पारसे, शिवाजी राजगे,ज्ञानेश्वर बाबर, शहनवाज आतार आदी तज्ञ मंडळी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत.गीताबाई बनकर विद्यालयात व उत्कर्ष विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते दहावी पर्यंतच्या शिक्षकांसाठी सदर प्रशिक्षण आयोजित केले असून या प्रशिक्षणाचा हा पहिला टप्पा आहे.या प्रशिक्षणात 400 शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत, चहा व जेवणाची सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.