महाराष्ट्र
गणेश नगर शाळेत “आनंदी बाजारा”ने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

नाझरा(प्रतिनिधी):- चोपडी केंद्र अंतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेश नगर येथे बुधवारी आनंदीबाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. सदर बाजाराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तात्यासो बाबर यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी परिसरातील सचिन खळगे नितीन खळगे यांच्यासह इतर पालक व महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या बाजारामध्ये मसाला पापड ,पाणीपुरी , पावभाजी, बाकरवडी, पालक भजी, वडापाव, भेळ, गुलाब जामून, समोसा, बटाटा भजी, आईस्क्रीम यासारख्या चटपटीत पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच लिंबू सरबत, स्ट्रॉबेरी ज्यूस, उसाचा रस, सेंद्रिय गुळाचा चहा यासारख्या पेय पदार्थांचेही विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले होते. काही विद्यार्थी फळांचे विक्रेते बनले होते.
यामध्ये द्राक्षे, सफरचंद, देशी केळी ,कलिंगड, बोरे , चिकू ,काकडी, गाजर , रताळे या विविध प्रकारांचा समावेश होता. वांगी ,मुळा ,कारली ,दोडका, टोमॅटो, शेवग्याची शेंग, मुळ्याच्या शेंगा,घेवडा, कांदा,भेंडी सारख्या फळभाज्या विकणारे ही विक्रेते होते. शेपू पालक मेथी कोथिंबीर चाकवत अळू यासारख्या पालेभाज्या विकणारे विद्यार्थीही भरपूर होते. याचबरोबर बांगड्या, टिकल्या विक्री करणारी एक विद्यार्थिनी होती. त्याचबरोबर कुरकुरे बिस्किटे, कॅडबरी, चॉकलेट यासारखे यार पदार्थ फूड वीक्रेते विद्यार्थीही होते. शाळेतील विद्यार्थ्यांना परिसरात पिकवल्या जाणाऱ्या फळभाज्या,पालेभाज्या, वेल भाज्या, परिसरातील फळांची माहिती व्हावी. त्याचबरोबर पालेभाज्यांची खरेदी विक्री कशी केली जाते याची जाणीव व्हावी तसेच व्यावहारिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजावा यासाठी मुख्याध्यापक राजाराम बनसोडे व रूपली पवार या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी व पालकांनी सदर बाजारात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सर्व विद्यार्थ्यांनी आणलेले सर्व पदार्थ विकले गेले. तर बाजारामध्ये जवळपास 20 हजार रुपयांची उलाढाल झाली. जिल्हा परिषद शाळेबरोबरच अंगणवाडी सेविका विजया मेखले यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनीही सदर बाजारामध्ये सहभाग नोंदवला.केंद्रप्रमुख गाडे व गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांचेकडून गणेशनगर शाळेस सदर कार्यक्रमास प्रोत्साहन देण्यात आले.