सांगोला न्यायालय आवारातील नवीन लॉयर्स चेंबर परिसरात वृक्षारोपण

सांगोला(प्रतिनिधी):-निसर्ग मानवाला खूप काही देत असतो. याची जाण ठेवून निसर्गाचं आपण देण आहे. या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकांने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपआपल्या क्षेत्रात वृक्षारोपण करुन किमान एक तरी झाड लावावे,वाढती लोकसंख्या, वाहनांचा अति वापर, त्यामुळे निर्माण होणाजया प्रदूषणामुळे शहरात श्वास घेणं कठीण झालंय. शुद्ध हवा, ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही. वृक्ष आपल्याला फक्त पाने, फुलेच देत नाहीत, तर आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात. नवी आशा देतात. उमेद देतात. म्हणूनच वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करा असे आवाहन ज्येष्ठ विधीज्ञ अॅड.संजीव शिंदे यांनी केले.
सांगोला न्यायालयाच्या परिसरात नवीन लॉयर्स चेंबर तयार करण्यात आले आहे. या परिसरात काल बुधवार दि.12 फेब्रुवारी रोजी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अॅड.राजेंद्र चव्हाण, अॅड.नितीन गव्हाणे, अॅड.विशालदिप बाबर, अॅड.समाधान दिवसे, अॅड.नितीन बाबर, अॅड.गणेश खटकाळे, अॅड.रमेश चांडोले, अॅड.समाधान खांडेकर,अॅड.सुनिता धनवडे उपस्थित होते.
पुढे बोलताना अॅड.संजीव शिंदे म्हणाले, वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणलीय. आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगनभरारी घेतली, प्रगती साध्य केली; परंतु आपल्या कृतीने पर्यावरणाचा क्षय होतोय याकडे मात्र दुर्लक्ष केले. याचेच परिणाम आज आपण पाहत आहोत. वातावरण बदलामुळे पावसाची अनिश्चितता वाढलीय. जागतिक तापमानातील वाढीमुळे पृथ्वीवरील मानवाचं, सजीवांचं अस्तित्व धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे सिमेंटचे वाढते जंगल आणि निसर्गाची झपाटयाने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे असून स्वत:च्या अस्तित्वासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे गरजेचे बनले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.