माणगंगेच्या मदतीला धावली कृष्णामाई, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करून माण व कोरडा नदीवरील बंधारे भरून देण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेतली असून टेंभू व म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आल्याने रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळणार आहे. टेंभू योजनेचे पाणी बुद्धेहाळ तलावात सोडून पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार आहे. त्यानंतर टेंभूचे पाणी माण नदीत सोडून बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार आहेत. टेंभू योजनेच्या रुपाने माणगंगेच्या मदतीला कृष्णामाईच धावून आल्याने सांगोल्यातील जनतेला, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
सध्या सांगोला तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. नदी, तलाव,बंधारे ओढे, नाले कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. पाणी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली जात आहे. काही ठिकाणी पाण्याअभावी पिके वाळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या शुभारंभाच्या उद्घाटनासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर हे चिकमहूद येथे आले होते. त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांची भेट घेऊन तालुक्यातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करून माण व कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्काळ पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकरी सुखावला आहे. सध्या टेंभू, म्हैसाळचे आवर्तन सुरू असून रब्बी हंगामातील पिकांना व फळबागांना जीवदान देण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी टेंभू योजनेचे पाणी माण नदीत सोडून बलवडी ते मेथवडेपर्यंतचे सर्व बंधारे भरून येणार आहेत. टेंभू योजनेचे पाणी बुद्धेहाळ तलावात सोडून पूर्ण क्षमतेने बुद्धेहाळ तलाव भरून घेण्यात येणार आहे. त्यानंतर टेंभूचे पाणी माण नदीत सोडून बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार आहेत. म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरून देण्यात येणार आहेत. टेंभू प्रकल्पाच्या पाण्याचे आवर्तन मिळाल्यास जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. टेंभूचे पाणी माण नदीत सोडण्यात येणार असल्याने बलवडी, वझरे, नाझरे, चिणके, अनकढाळ, वाटंबरे, कमलापूर, वासुद, अकोला, कडलास, वाढेगाव, बामणी, सावे, मांजरी, देवळे, मेथवडे या गावांसह अन्य १५ ते २० गावांना फायदा होणार असून या पाण्यामुळे सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. टेंभूच्या आवर्तनाचे पाणी सर्व गावांना व्यवस्थित देऊन माण नदीवरील सर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन करून पाणी सोडण्याच्या सूचना टेंभूच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.