डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला मध्ये “योग व ध्यान” या विषयावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे योग तज्ञ मार्गदर्शक श्री मिलिंद पतकी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योग व ध्यान या प्राचीन पद्धतींचे शारीरिक आणि मानसिक फायदे समजावून सांगितले.
व्याख्यानात प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात अभ्यासाचा ताण, परीक्षेची चिंता आणि सोशल मीडियामुळे निर्माण होणारा दबाव यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात येत आहे. यावर उपाय म्हणून योग आणि ध्यान हे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “योगाने शरीर लवचिक आणि निरोगी राहते, तर ध्यानामुळे मन शांत आणि एकाग्र राहते,” असे त्यांनी स्पष्ट केले. या व्याख्यानात मनावर कसे नियंत्रण मिळवायचे यासाठी ५ ते १० मिनिटांच्या लहान ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांनी मनःशांतीचा अनुभव घेतला. “ध्यान ही एकाग्रतेची सर्वोच्च अवस्था आहे” असे सांगितले आणि रोज काही मिनिटे सराव करण्याचा सल्ला दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सिकंदर मुलाणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या विशेष व्याख्यानाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. जोतिबा हुरदुखे तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागाचे प्रा. अशोक वाकडे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.