शेतकऱ्याचा मुलगा बनला डॉक्टर.. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण*

नाझरे प्रतिनिधी
– शानमुखानंद हॉल, सायन येथे संपन्न झालेल्या भव्य पदवी प्रदान समारंभात डॉ. ओंकार मंदाकिनी राजकुमार पाटील यांना ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. गट रुग्णालय यांची प्रतिष्ठित एमबीबीएस पदवी प्रदान करण्यात आली. हा सन्मान डॉ. छाया वाळवी (उप अधिष्ठाता – पदवीपूर्व) आणि बालरोग विभागाच्या प्राध्यापिका यांच्या हस्ते करण्यात आला.
या समारंभाला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव, तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक आणि सहसंचालक उपस्थित होते. त्यांनी नवोदित डॉक्टरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना डॉ. छाया वाळवी यांनी वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदारी आणि नैतिक मूल्यांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी नवीन डॉक्टरांना समाजसेवा आणि निःस्वार्थ वैद्यकीय कार्य करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
नाझऱ्याचे रहिवासी असलेले डॉ. ओंकार पाटील यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जे. जे. रुग्णालयातून कठोर प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाच्या अविरत पाठिंब्याला दिले.
डॉ. ओंकार पाटील यांनी विशेषत: आपल्या आई-वडिलांच्या अथक परिश्रमांचे आणि त्यागाचे मनःपूर्वक स्मरण केले. शेतकरी असलेल्या त्यांच्या आई-वडिलांनी अनेक आर्थिक आणि सामाजिक आव्हानांना तोंड देत मुलाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरत संघर्ष केला. त्यांच्या कठोर परिश्रम आणि जिद्दीमुळेच हे यश शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले.
यासोबतच भाऊचा ( निहार ) पाठिंबा देखील त्यांनी गौरवला, जो स्वतः वैद्यकीय शिक्षण घेत आहे आणि भविष्यात डॉक्टर होण्याच्या मार्गावर आहे. कुटुंबाच्या प्रेमाने आणि आधाराने मिळालेले हे यश त्यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला समर्पित केले.
हा पदवी समारंभ नवोदित डॉक्टरांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला, जिथे त्यांनी समर्पण आणि करुणेने आरोग्यसेवेत योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.



