राजकीय

तालुक्यातील शेतकर्‍यांच्या व्यथा व समस्या आदित्य ठाकरे सरकारी दरबारी मांडणार- अनिल कोकीळ

सांगोला:-शिवसेना नेते आ.आदित्य ठाकरे यांची  सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधव वाट बघत आहे. आ.आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍यामुळे शेतकरी बांधवामध्ये आनंदाचे वातावरण असून संवेदनशिल नेता आमच्याकडे येतोय त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवामध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.प्रशासनापेक्षा शेतकरी काय सांगतो हे महत्वाचे असून सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल यासाठी आ.आदित्य ठाकरे यांचा हा दौरा असणार आहे. तालुक्यातील शेतकरी बांधवाच्या व्यथा व समस्या आदित्य ठाकरे सरकारी दरबारी मांडणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बुधवार दि.9 नोव्हेंबर रोजी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सांगोला दौर्‍यासंदर्भात काल सोमवार दि.7 नोव्हेंबर रोजी सांगोला येथे सांगोला शिवसेना यांच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी संपर्क प्रमुख सोलापूर अनिल कोकीळ, शिवसेना नेते लक्ष्मण हाके, युवा सेना विस्तारक उत्तम ऐवळे, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे,सुर्यकांत घाडगे, कमरुद्दीन खतीब उपस्थित होते.यावेळी अनिल कोकीळ बोलत होते.
आ.आदित्य ठाकरे हे 9 नोव्हेंबर रोजी सकाळी औरंगाबाद येथून सोलापूर येथे पोहचणार आहे. सकाळी 11 वाजता सोलापूर येथून संगेवाडी ता.सांगोला येथे येणार आहे. याठिकाणी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकरी बांधवाशी थेट बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत. त्यानंतर मांजरी येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार असून समस्या जाणून घेणार आहेत. शिवसेना नेते व माजी पर्यटन मंत्री आ.आदित्य ठाकरे शेतकरी बांधवाच्या व्यथा ऐकून घेणार असून त्या समस्या व व्यथा सरकारी दरबारी मांडणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासोबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे असणार आहेत.
पुढे बोलताना अनिल कोकीळ म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे. शासनाने आदेश काढून देखील काही ठिकाणी पंचनामे झाले नाहीत त्यामुळे शेतकर्‍यांनी काय करावे हा मोठा प्रश्न शेतकर्‍यापुढे पडला आहे. शेतकरी बांधवांच्या समस्यांवर सरकार दरबारी आवाज उठवल्याशिवाय शिवसेना गप्प राहणार नाही. शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी फक्त शिवसेना बांधील असून शेतकरी बांधवांना कधीही वार्‍यावर सोडणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी  शिवसेना ठामपणे उभी राहणार असून शेतकरी बांधवांच्या समस्या ऐकून घेऊन त्या शासन दरबारी सोडविण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जातील असे सांगत  सबंध राज्यातील शेतकरी बांधवाना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिलासा दिला असून येणार्‍या कालावधीत शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करणार आहेत त्यामध्ये सांगोला सुध्दा दौरा असणार असल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले.
यावेळी युवा सेना संमन्वयक शंकर मेटकरी, तुषार इंगळे, रघुनाथ गायकवाड, सुभाष भोसले, नवल कुमार गाडे, समाधान चव्हाण, सौरभ चव्हाण, भारत मोरे, अरविंद पाटील, गोरख यजगर,अक्षय रुपनर, अस्लम मुलाणी,  यांच्यासह पदाधिकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!