इंदापूर जत महामार्गाच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक..!कडलास येथे माण नदीच्या पुलावर रास्ता रोको

सांगोला : इंदापूर जत या महामार्गावरील सांगोला तालुक्याच्या हद्दीतील सांगोला महुद रस्ता, शिवाजी पॉलीटेक्निक कॉलेज ते गायकवाडवस्ती रस्ता आणि सोनंद येथील पुलाचे अर्धवट काम तात्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत कडलास ता सांगोला येथील माण नदीच्या पुलावर तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमालाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास हे आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, महादेव गायकवाड, युवकचे अनिल खटकाळे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत कारंडे, महादेव पवार, विजय पवार, बाळासाहेब शिंदे, सुनील साळुंखे, दिलीप नागने, यशवंत खबाले, चंद्रकांत बागल, योगेश खटकाळे, माजी सभापती अनिल मोटे, सूर्याजी खटकाळे, सतीश काशीद, ज्ञानेश्वर शिंदे, संभाजी हरीहर, राज मिसाळ, मच्छिंद्र माने, गिरीश गायकवाड, संतोष पाटील, साहिल इनामदार, सुरेश गावडे, अनिल सुतार, जयवंत नागणे, शिवाजी जावीर, पोपट खाटीक, दीपक जाधव, अजित गोडसे, शिवानंद पाटील, भूषण बागल, असलम पटेल, राहुल ढोले, सखुबाई वाघमारे, शोभा खटकाळे, सरस्वती रणदिवे, शशिकला खाडे, शकुंतला खडतरे, सुजाता कांबळे, सरपंच मंगल भुसे, हसीना मुलानी, मनीषा मिसाळ, जयश्री पाटील, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, गेली वर्षभरापासून कडलास, महूद आणि सोनंद परिसरातील नागरिक महामार्ग प्रशासनाकडे वारंवार लेखी आणि तोंडी तक्रार करत आहेत. सांगोला-महुद या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे, कडलास येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज ते गायकवाडवस्ती परिसर आणि सोनंद येथील अर्धवट पुलाचे काम गा परिसर सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. तरी महामार्ग प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. महामार्गाचे काम अर्धवट असल्याने या परीसरात दररोज अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी वेळोवेळी चालढकल केल्याने प्रशासकीय निष्काळजी पणामुळेच सांगोला तालुक्यातील १५ ते २० जणांचे बळी गेले आहेत. या परिसराचे नेतृत्व करत असताना आणि याच रस्त्यावरून दररोज ये-जा करत असताना आमच्या तालुक्यातील लोक प्रशासकीय हलगर्जीपणामुळे आमच्या डोळ्यासमोर मरत असल्याचे आपण पाहू शकत नाही. त्यामुळे इथून पुढे आम्ही शांत राहणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आम्ही इथून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा मा. आम. दिपकआबा, जयमालाताई आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी घेतल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ यांची बैठक आयोजित करून दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिले. सोमवार दि सात रोजी मालट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या आदर्श ग्रामसेविका स्वप्नाली सोनलकर यांना सर्व आंदोलनकर्त्यांनी श्रद्धांजली वाहून रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.
सोमवार दि. ७ नोव्हेंबर रोजी कडलास येथे झालेल्या अपघातात आदर्श ग्रामसेविका स्वप्नाली सोनलकर यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक रास्ता रोको करून या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक हे आंदोलन केल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाच्या निमित्ताने रस्ता तर नीट होईल आणि आपली कायमची गैरसोय दूर होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त करून वाहनधारकांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला.
१) दोन दिवसांत कार्यवाही करण्याचे प्रशासनाकडून आश्वासन
मंगळवारी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत मान नदीच्या पुलावर रास्ता रोको केल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. तहसीलदार अभिजीत पाटील व पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांसह महामार्ग प्रशासनाचे दाणे घटनास्थळी उपस्थित राहून संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी तात्काळ बैठक आयोजित करून दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन तहसीलदार अभिजीत पाटील यांनी आंदोलनकर्त्यना दिले.
२) अन्यथा अधिकाऱ्यांना बाहेर पडू देणार नाही..!
सांगोला तालुक्यातील या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आजपर्यंत वारंवार संबंधित प्रशासनाला लेखी व तोंडी तक्रार केली आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने आज आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली. या गंभीर विषयाकडे तात्काळ लक्ष न दिल्यास पुढील काळात तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून एकाही अधिकाऱ्याला बाहेर फिरू देणार नाही असा गर्भित इशाराच यावेळी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.