महाराष्ट्र
सांगोला: फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला स्वायत्तता दर्जा: (Autonomous) उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

सांगोला – सांगोला सारख्या ग्रामीण व दुष्काळी भागातील होतकरू विद्यार्थ्यांना उच्च तांत्रिक शिक्षण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने फॅबटेक एज्युकेशन सोसायटीने २०११ मध्ये फॅबटेक टेक्निकल कॅम्पसची स्थापना केली. या कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजसह डिप्लोमा, फार्मसी डिग्री आणि सीबीएसई माध्यमाचे पब्लिक स्कूल असे विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
नुकतेच, विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), दिल्ली यांनी फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला यांना स्वायत्तता (Autonomous) दर्जा प्रदान केला आहे. या महत्त्वपूर्ण यशाबद्दल फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे व्हॉइस प्रेसिडेंट श्री. भाऊसाहेब रूपनर आणि कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. त्यांच्यासोबत राज्याचे मंत्री श्री. शंभूराजे देसाई, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. जयकुमार गोरे, सांगोल्याचे आमदार श्री. बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार श्री. शहाजीबापू पाटील हे देखील उपस्थित होते.
मा. उपमुख्यमंत्र्यांनी फॅबटेक कॉलेजच्या या महत्त्वपूर्ण यशाबद्दल संस्थेचे अभिनंदन केले आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याची प्रशंसा केली. मंत्री श्री. शंभूराजे देसाई आणि पालकमंत्री श्री. जयकुमार गोरे यांनीही फॅबटेक कॉलेजच्या व्यवस्थापनाचे आणि प्राध्यापकांचे अभिनंदन केले. त्यांनी संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेतली. आमदार श्री. बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार श्री. शहाजीबापू पाटील यांनी फॅबटेक कॉलेजच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला आणि भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्काराबद्दल श्री. भाऊसाहेब रूपनर आणि डॉ. संजय आदाटे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शिरपेचात या स्वायत्तता आणि सत्कारामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे, ज्यामुळे संस्थेला पुढील शैक्षणिक वाटचालीस प्रेरणा मिळाली आहे. प्रशासकीय कौशल्याच्या आधारावर अल्पावधीतच कॅम्पसला नावारूपाला आणणारे संस्थेचे चेअरमन व विश्वस्त श्री. भाऊसाहेब रूपनर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे याप्रसंगी विशेष कौतुक करण्यात आले.