सांगोला ( प्रतिनिधी )- सांगोला वाढेगाव रस्ता खूपच खराब झाल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करावे अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह सुरवसे यांनी दिला आहे.
.
सोलापूर व कोल्हापूरला जाण्यासाठी पूर्वी वाढेगाव मार्गे सर्वांना जावे लागत होते. आता राष्ट्रीय महामार्गाचा वापर होत असल्यामुळे सांगोला वाढेगाव या ७ किलोमीटर रस्त्याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे दुचाकी तसेच चार चाकी वाहनधारकांना मोठी कसरत करत आपली वाहने चालवावी लागत आहेत. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे वाहनांचे मोठे नुकसानही होत असून वाहनधारकांना मणक्यांच्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे.
यापूर्वी राज्य मार्ग विभागाकडे असलेला हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. याची देखभाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने करायची असताना सुद्धा या रस्त्याकडे संबंधित अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विजयसिंह सुरवसे यांनी केला आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे डांबरीकरण केले नाही तर यासाठी आपण आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचेही विजयसिंह सुरवसे यांनी यावेळी सांगितले.