नाझरा (वार्ताहर):- सांगोला तालुक्यातील नाझरा केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरगरवाडी येथील राजाराम तेली यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगोला पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील चौगुले हे होते तर व्यासपीठावर शिक्षण विस्ताराधिकारी अमोल भंडारी, केंद्रप्रमुख अप्पासाहेब पवार, युवा नेते विजय सरगर,संजय सरगर दामाजी आलदर, अशोक पाटील ,प्रा. विजय गोडसे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजाराम तेली यांचे सहकारी ह.भ.प हनुमंत फुले महाराज म्हणाले की, माझ्या शैक्षणिक सेवेची सुरुवात तेली गुरुजींसोबतच झाली.अतिशय मनमिळावू, त्याचबरोबर विनोद बुद्धी जागृत ठेवून जिथे जाईल तिथे हास्याची मैफिल रंगवणारे असे माझे जिवाभावाचे मित्र आज सेवानिवृत्त होत आहेत. सेवेच्या पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आमची मैत्री घट्ट होते आणि या पुढील काळातही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आमची मैत्री घट्टच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी वर्गमित्र अशोक पाटील यांनी तेली गुरुजींच्या संदर्भात अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी अमोल भंडारी, शिक्षक नेते अमोगसिद्ध कोळी,शिक्षक समितीचे सरचिटणीस दत्तात्रय शिंदे व नयन पाटील यांनी आपल्या मनोगतातून गुरुजींना पुढील आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नेते सुरेश ढोले, माजी चेअरमन हंमजू काका मुलांणी, कमलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बशीर मुलाणी यांच्यासह सांगोला तालुक्यातील अनेक शिक्षक बांधव,तेली गुरुजी यांचे नातेवाईक,नाझरा परिसरातील ग्रामस्थ,पालक, विविध मंडळाचे कार्यकर्ते कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिगंबर शिंदे यांनी केले.