महूद, ता. १५ : लोकशाहीच्या चार प्रमुख स्तंभा पैकी न्यायालय हा महत्त्वाचा स्तंभ आहे.न्यायव्यवस्थेमुळे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण होते आणि कायद्याचे राज्य अबाधित राहते. या न्यायालयाचे काम नेमके कसे चालते याची माहिती घेण्यासाठी एखतपूर(ता.सांगोला)येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांगोला तालुका न्यायालयास नुकतीच भेट दिली.न्यायासन कक्षात चालणारे खटल्याचे प्रत्यक्ष काम आणि न्यायाधीशांशी साधलेला संवाद यामुळे विद्यार्थी भारावून गेले.
सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या पूर्वपरवानगीने एखतपूर(ता.सांगोला) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेमधील इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सांगोला तालुका न्यायालयास शुक्रवार(ता.११) रोजी भेट दिली.यावेळी न्यायालयीन कर्मचारी योगेश तारे व श्री. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन न्यायालयातील प्रत्येक कक्षाची माहिती दिली.न्यायालयामधील पुराव्यांची खोली,आवक -जावक टेबल,तक्रार दाखल करण्याचे टेबल,तपासणीचे टेबल व न्यायालयातील सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवल्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले.तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष खटल्याची सुनावणी कशाप्रकारे होते याचे प्रात्यक्षिक न्यायासन कक्षामध्ये नेऊन दाखवण्यात आले.
यावेळी मुख्य दिवाणी न्यायाधीश बी. एम.पोतदार, सह दिवाणी न्यायाधीश के.बी.सोनवणे व त्यांचा स्टाफ यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष खटल्याचे कामकाज कसे चालते याचे प्रात्यक्षिक दाखविले . त्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रत्यक्ष व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे कशाप्रकारे न्यायालयीन कामकाज होणार आहे याचे प्रात्यक्षिक दाखविले.
जिल्हा सत्र न्यायालयाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना जागतिक आरोग्य दिवस या विषयावर विधिज्ञ पी.डी. राजमाने यांनी मार्गदर्शन केले.जागतिक पर्यावरण दिनाविषयी विधिज्ञ बी.बी.देशमुख यांनी मार्गदर्शन केले.तर बालमजुरी प्रतिबंध कायदा समजावून सांगताना विधिज्ञ जी.एम.खटकाळे म्हणाले की, १४ वर्षाखालील मुलांना मजुरीवर ठेवू नये. तो कायद्याने गुन्हा असून त्याला शिक्षा होऊ शकते.मुख्याध्यापक हणमंत जाधव यांनी आपले मनोगतात विद्यार्थ्यांना या भेटीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल न्यायालयीन व्यवस्थेचे आभार मानले.प्रास्ताविक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड्.मारूती ढाळे यांनी केले.उपाध्यक्ष ॲड्. समाधान दिवसे यांनी सूत्रसंचालन केले तर सहसचिव ॲड्. सुप्रिया बोत्रे यांनी आभार मानले. यावेळी बार असोसिएशनचे सचिव ॲड्. तायप्पा तोरणे, शिक्षिका अरिफा शेख,सुरेखा शिंदे,स्वाती नीलकंठ,ज्ञानेश्वर इंगोले आदी उपस्थित होते.
——————————————-
विद्यार्थ्यांनी साधला न्यायाधीशांशी संवाद
न्यायाधीश बी.एम.पोतदार यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.त्यांनी सहजपणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.न्यायाधीश पदाला गवसणी घालण्यासाठी प्रचंड मेहनत, चिकाटी, जिद्द व अविरत अभ्यास करावा लागतो हे स्पष्ट केले.शिवाय एखतपूर शाळेतील शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना न्यायालयास समक्ष भेट देऊन माहिती जाणून घेण्याचे संधी मिळाली. विद्यार्थी या संधीचा चांगला उपयोग आपल्या भावी जीवनात नक्कीच करतील असा आशावाद व्यक्त केला.यावेळी शाळेचा विद्यार्थी शार्दूल ज्ञानेश्वर इंगोले याचा मंथन परीक्षेमध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक आल्याबद्दल वही व गुलाबपुष्प देऊन न्यायाधीशांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.