फॉरेस्टमध्ये ट्रेकिंग व बुद्धेहाळ तलाव परिसरात पक्षी निरीक्षण करून पक्षी प्रेमीनी लुटला आनंद!

सांगोला (प्रतिनिधी )- पक्षप्रेमींनी शुकाचार्य डोंगर ते डोंगर पाचेगाव फॉरेस्ट येथे ट्रेकिंग करत बुद्धेहाळ तलाव परिसरात पक्षी निरीक्षण करून आनंद लुटला. वन परीक्षेत्र कार्यालय, सांगोला, पक्षी प्रेमी ग्रुप व आपुलकी प्रतिष्ठान यांच्यावतीने पक्षी निरिक्षण व ट्रेकिंग आयोजित केले होते.
वन्यजीव अभ्यासक अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन ५ नोव्हेंबर आणि थोर पक्षी तज्ञ पद्मभूषण डॉक्टर सलीम अली यांची जयंती १२ नोव्हेंबर दरम्यान राज्यात पक्षी सप्ताह साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने सांगोला येथील पक्षीप्रेमी ग्रुप, वन परीक्षेत्र सांगोला व आपुलकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पक्षी निरीक्षण व ट्रेकिंग चे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ६ वाजता सांगोला येथून निघून पक्षी मित्रांनी प्रथम शुकाचार्य येथे जाऊन शुक्राचार्य चे दर्शन घेतले त्यानंतर शुकाचार्य डोंगरापासून दऱ्या उतरत डोंगर पाचेगाव येथे पोहोचले. पावसाळ्यानंतरच्या हिरव्यागार निसर्गाचा आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद पक्षी प्रेमीनी ट्रेकिंग करताना लुटला. त्यानंतर बुद्धेहाळ येथील तलाव परिसरात भटकंती करत विविध प्रकारच्या देशी, परदेशी पक्षांचे निरीक्षण केले.वनभोजनाने या उपक्रमाची सांगता झाली.
या उपक्रमात वनपाल एस. एल. मुंढे, वनरक्षक बी.पी. इंगोले, वनरक्षक जी.बी.व्हरकटे, वनपाल एस. ए.घावटे, वनपाल एस. एल. वाघमोडे, वनरक्षक ए.के.कारंडे, आर. बी. कवठाळे यांच्यासह वन मजूर व त्याचबरोबर राजेंद्र यादव, दीपक चोथे, प्रा. विधीन कांबळे, प्रा. एस. के. पाटील, बाळासो नकाते, छाया यादव, सुजाता पाटील, तेजश्री कांबळे, शोभनतारा मेटकरी यांच्यासह पक्षी प्रेमी ग्रुप सदस्य, आपुलकी प्रतिष्ठान सदस्य सहभागी झाले.
ट्रेकिंग आणि पक्षी निरीक्षणाच्या या उपक्रमात 73 वर्ष वय असलेल्या हरिभाऊ जगताप गुरुजी आणि प्रकाश महाजन या दोन जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेऊन या वयातही ट्रेकिंग करून ते यशस्वी करत आनंद लुटल्याबद्दल त्यांचे वन खात्याने विशेष असे अभिनंदन केले.