विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय -प्राचार्य बिभीषण माने

नाझरा (वार्ताहर):-आपला पाल्य सर्वगुण संपन्न व्हावा असे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते.आपल्या मुलाला ज्या विषयात अधिक रुची आहे त्या विषयातील सर्वोत्तम ज्ञान मिळावे असे प्रत्येक पालकांना वाटत असते. आपला पाल्य एक संस्कारक्षम पाल्य म्हणून घडावा असा आशावाद घेऊन नाझरा विद्यामंदिरच्या प्रांगणात आपण आपल्या मुलास घेऊन आला आहात. विद्यामंदिरच्या प्रांगणात आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हेच विद्यामंदिर परिवारातील प्रत्येक शिक्षकाचे ध्येय आहे, असे प्रतिपादन नाझरा विद्यामंदिर प्रशाला व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य बिभीषण माने यांनी केले.
नाझरा विद्या मंदिर प्रशालेत आयोजित केलेल्या एन.एम.एम.एस अर्थात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असणाऱ्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेल्या विद्यार्थी पालक व शिक्षक सहविचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी बाळासाहेब पाटील, पर्यवेक्षक विनायक पाटील, बाह्य परीक्षा विभाग प्रमुख महालिंग पाटील, एन.एम.एम.एस.विभाग प्रमुख गुरुदेव उजनीकर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमापूजनाने सहविचार सभेचे सुरुवात झाली.त्यानंतर विषय शिक्षकांची ओळख करून देण्यात आली. यावेळी बाळासाहेब यादव,नागेश रायचूरे,हणमंत मेखले यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
पुढे बोलताना प्राचार्य माने म्हणाले की विद्यामंदिर प्रशालेत राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक परीक्षेचे अतिशय अचूकतेने नियोजन केले जाते.आपला पाल्य व शिक्षक यांच्यात होणाऱ्या सुसंवादातून विद्यार्थ्यांची प्रगती होत असते. आपण ज्या विश्वासाने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवले आहेत तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आमचे शिक्षक शर्तीचे प्रयत्न करणार आहेत. तंत्रज्ञानात वावरणाऱ्या या पिढीला अतिशय काळजीपूर्वक जपावं लागणार आहे याची जाणीव सर्वांनी सातत्याने ठेवावी. विभाग प्रमुख गुरुदेव उजनीकर यांनी एन एम एम एस परीक्षेसाठी ज्या कागदपत्रांची आवश्यकता असते अशा सर्व गोष्टींची माहिती पालकांना दिली. पालक सभेसाठी 40 पालक उपस्थित होते. प्रास्ताविक सोमनाथ सपाटे यांनी केले, आभार पर्यवेक्षक विनायक पाटील यांनी मांनले तर सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले.