पुस्तकाने जीवनाला समृद्धता येते-दिनेश देशमुख

नाझरा (वार्ताहर):- समाजात आत्महत्या सारख्या विविध प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत. या घटनेच्या पाठीमागे त्यांचा एकटेपणा आहे. ज्याला वाचता येतं त्याने कपाटातल्या पुस्तकाशी मैत्री करायला हवी,ज्याची पुस्तकाशी मैत्री झाली तो जीवनात कधीच एकटा पडत नाही. जो पुस्तकाच्या जवळ गेला तो यशाच्या जवळ जातोच. पुस्तकाने जीवनाला समृद्धता येते असे प्रतिपादन आटपाडी येथील वाचन आकलन चळवळीचे कार्यवाह दिनेश देशमुख यांनी केले.
नाझरा विद्यामंदिर मध्ये आयोजित केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी च्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका मंगल पाटील, पर्यवेक्षक विनायक पाटील आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे यांच्या विविध प्रकारच्या साहित्यातून जगासमोर आले.जगातल्या अनेक भाषांमध्ये त्यांचे साहित्य रूपांतरित झाले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभाग नोंदवला. त्याच बरोबर दीन-दलितांची दुःख साहित्यातून विशद केली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची प्रखर भूमिका ब्रिटिश राजवटीला हादरवून सोडणारे होती.केसरी या वर्तमानपत्राच्या माध्यमातून इंग्रज सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल विचारणारे लोकमान्य टिळक स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेतील शिक्षक दीपक शिंदे यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचा जीवन परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.गायत्री कांबळे या विद्यार्थिनील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार दिलीप सरगर यांनी मानले.



