ऑनलाईन विवाह पद्धतीतून होणारी फसवणूक टाळण्यासाठी वधू-वर परिचय मेळावे अत्यंत महत्त्वाचे- प्रा.प्रबुद्धचंद्र झपके

ऑनलाईन विवाह पद्धतीतून होणारी फसवणूक टाळण्यासाठी वधू-वर परिचय मेळावे अत्यंत महत्त्वाचे- प्रा.प्रबुद्धचंद्र झपक
आधुनिक युगामध्ये सर्वच बाबतीत सोशल मीडिया अधिक प्रभावी होताना दिसत आहे. अशा या काळात अनेक ऑनलाईन वधू-वर सूचक मंडळाद्वारे ऑनलाइन विवाह पद्धती समाजामध्ये आपले अस्तित्व निर्माण करू पाहत आहे अशा परिस्थितीत दररोज अनेक ठिकाणी ऑनलाइन विवाह पद्धतीच्या अनुषंगाने अनेकांची फसवणूक झाल्याच्या बातम्या आपण ऐकतो आहे. म्हणूनच अशी फसवणूक टाळण्यासाठी वधू वर परिचय मेळावे आयोजित करणे ही आता काळाची गरज बनली आहे. असे मत महाराष्ट्र वीरशैव सभा,पुणे चे प्रांतिक अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी मांडले.
दि.१३ नोव्हेंबर रोजी वीर शिवसभा जिल्हा शाखा नांदेड,युवा आघाडी व महिला आघाडी यांच्या तर्फे भक्ती लॉन्स मंगल कार्यालय, मालेगाव रोड, नांदेड याठिकाणी वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी भूषविले. यावेळी महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे चे प्रांतिक सरचिटणीस चंद्रशेखर होनराव, प्रांतिक कोषाध्यक्ष सुरेंद्र गाढवे, प्रांतिक उपाध्यक्ष गुरुपादप्पा पडशेट्टी, प्रांतिक सहचिटणीस महेशअप्पा शेटे, प्रांतिक सहचिटणीस रामदास भोसले, शारदा कन्स्ट्रक्शन नांदेडचे चेअरमन तथा संचालक सुमित मोरगे, शारदा कन्स्ट्रक्शन नांदेडच्या संचालिका श्रीमती वंदनाताई मोरगे, ग्लोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ.त्र्यंबकराव दापकेकर व शासकीय कंत्राटदार माधवराव पटणे हे उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे प्रदेश समितीतर्फे माजी प्रांतिक अध्यक्ष बाबासाहेब कोरे व विश्वनाथ हजारे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आजच्या या धावपळीच्या जीवनात देखील या वधू-वर परिचय मेळाव्यास दोन हजारहून अधिक लोकांनी उपस्थिती नोंदविली होती हे या मेळाव्याचे यशच म्हणावे लागेल.