महाराष्ट्र

सूर्योदय फाउंडेशन च्या वतीने उद्या शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन 

सूर्योदय उद्योग समूहातील सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने आज  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला येथे दुपारी दोन वाजता शिक्षकदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक व फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.
नामवंत कवी, झी टॉकीज फेम कीर्तनकार आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा अविनाश भारती हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. मंगळवेढा उपविभागाचे प्रांताधिकारी बी आर माळी , सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे, डीवायएसपी डॉ बसवराज शिवपुजे, सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी, सांगोल्याचे गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले आणि प्रगतशील बागायतदार पांडुरंग ताटे इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते या सर्व पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती सूर्योदय फाउंडेशनचे सचिव जगन्नाथ भगत गुरुजी यांनी दिली.
सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती, सहकाराचा सखोल अभ्यास तसेच उद्योग आणि व्यवसाय याबरोबरच सामाजिक चळवळीचा पिंड असलेले अनिलभाऊ इंगवले यांनी जगन्नाथ भगत, डॉ. बंडोपंत लवटे व सुभाष दिघे यांना सोबत घेऊन सन 2010 साली सूर्योदयचे रोपटे सांगोला तालुक्यातील मेडशिंगी या ठिकाणी उभे केले. गेल्या पंधरा वर्षांपासून सूर्योदयाच्या माध्यमातून या तरुणांनी विविध क्षेत्रांमध्ये चौफेर प्रगती केलेली आहे. वित्तीय संस्था आणि उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला काम देत असताना दुसरीकडे सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम देखील मोठ्या प्रमाणावर केलेले आहे. सुरुवातीला मेडशिंगी फेस्टिवलच्या माध्यमातून राज्यातील अनेक समाजसेवक, लोकसेवक, वक्ते, हास्यसम्राट तसेच कीर्तनकार व कलाकारांना आणून हजारो ग्रामस्थांच्या साक्षीने समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले. पाणी फाउंडेशन, नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण, गुणवंतांचा सन्मान, विविध प्रकारची आरोग्य शिबिरे, व्यापक स्वरूपातील रक्तदान शिबिरे, कोरोना कालावधीत हजारो गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप , ग्रामीण भागातील महिलांना तीर्थयात्रा दर्शन अशा अनेक प्रकारे समाजाचे ऋण व्यक्त करत या उद्योग समूहाने आपली सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सूर्योदय फाउंडेशन च्या वतीने अनेक शाळांवरती तसेच सार्वजनिक ठिकाणी सुमारे अडीच हजार वृक्षांची लागवड करून त्यांची उत्तम प्रकारे जोपासना देखील सुरू ठेवलेली आहे.
नुकताच यावर्षी स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने सूर्योदय ग्रुपच्या वतीने एकाच वेळी महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील मिळून तीनशे शाळांवर सुमारे अठराशे विद्यार्थी आणि तब्बल साडेआठ हजार शिक्षकांना सन्मानित करून एक अनोखा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून स्वतःला झोकून देत उत्कृष्ट काम करणारे काही गुणवंत शिक्षक आणि समाजासमोर दीपस्तंभ बनून आदर्श उभा करणाऱ्या काही शाळा यांना या शिक्षकदिन कार्यक्रमात पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  मान्यवरांची मनोगते,  वक्ते आणि कवी अविनाश भारती यांचे सुश्राव्य व्याख्यान, पुरस्कार वितरण आणि स्नेहभोजन असे आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप असून या ‘ शिक्षक दिन ‘ कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सूर्योदय अर्बनचे चेअरमन डॉ. बंडोपंत लवटे आणि एल के पी मल्टीस्टेटचे व्हॉइस चेअरमन सुभाष दिघे गुरुजी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button