सांगोला : सांगोला महाविद्यालय, सांगोला येथील इतिहास विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौर्याचा उद्देश विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील ज्ञानासोबतच प्रत्यक्ष ऐतिहासिक स्थळांचे निरीक्षण करून सखोल माहिती मिळवून देणे हा होता.या दौर्यात विद्यार्थ्यांनी पन्हाळा किल्ला, ज्योतिबा डोंगरावरील मंदिर, कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर, शाहू वस्तुसंग्रहालय, रंकाळा तलाव तसेच शिवाजी विद्यापीठ या ठिकाणांना भेट दिली.
प्रत्येक ठिकाणी त्या स्थळाचे ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.पन्हाळा किल्ल्यावरील मराठेशाहीच्या वैभवशाली इतिहासाची माहिती कोल्हापूर येथील इतिहास संशोधक अभ्यासक श्री.अमित अडसुळे यांनी दिली.
ज्योतिबा मंदिराच्या धार्मिक महत्त्वाचे पैलू, अंबाबाई मंदिराच्या परंपरा, शाहू महाराजांच्या काळातील सामाजिक सुधारणा आणि रंकाळा तलावाच्या सांस्कृतिक वारशाबरोबरच शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.अभ्यास दौर्यात ३ शिक्षक आणि इतिहास विभागाचे ३३ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्थळदर्शनाचा अनुभव मिळाल्यामुळे त्यांच्या अभ्यासात रुची व समज वाढली. सहभागी विद्यार्थ्यांनी या दौर्याबद्दल समाधान व्यक्त करून अशा उपक्रमांमुळे इतिहास अधिक जिवंतपणे अनुभवता येतो असे मत मांडले.
इतिहास विभागाच्या या अभ्यास दौर्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक वारसा जपण्याची जाणीव तर निर्माण झालीच, तसेच भविष्यात संशोधन व अभ्यासाची दृष्टी अधिक विकसित होण्यासाठी ही मदत होईल, असा विश्वास महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले व्यक्त केला. हा ऐतिहासिक अभ्यास दौरा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ.सदाशिव देवकर, डॉ.महेश घाडगे आणि प्रा.अमोल ऐवळे यांनी यशस्वी केला.