महाराष्ट्र

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय बनवा- गटशिक्षणाधिकारी नवले

नाझरा( वार्ताहार) :- शिक्षकांच्या सहकार्याने विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थी स्वतःला सिद्ध करत आहे. शाळेमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या नवोपक्रमांकडून विद्यार्थी घडत असते. वर्गातल्या पुस्तकांबरोबर ग्रंथालयातल्या विविध विषयांवरच्या पुस्तकांमध्ये सुद्धा विद्यार्थी रमला पाहिजे. मैदानातही त्याची झेप दिसायला हवी. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आपल्या जगण्याचे ध्येय असावे असे प्रतिपादन सांगोला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांनी केले.

नाझरा विद्यामंदिर प्रशालेतील भेटी दरम्यान शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक बिभिषन माने, पर्यवेक्षक विनायक पाटील व शिक्षक उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले व नाझरे केंद्रप्रमुख मल्लय्या मठपती यांनी प्रशालेस भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशालेत सुरू असलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती घेतली. प्रशालेत सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल कौतुक करत काही महत्त्वपूर्ण सूचनाही दिल्या.
पुढे बोलताना गटशिक्षणाधिकारी नवले म्हणाले की, शासनाचे विविध प्रकारचे उपक्रम अतिशय महत्त्वपूर्ण व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करणारे असतात. अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही उपक्रमांकडे दुर्लक्ष न करता अतिशय काळजीपूर्वक प्रत्येक उपक्रम राबवावेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वांनी जपायची आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे बाबत पालकांनीही दक्षता घ्यावी. एकंदरीत नाझरा विद्यामंदिर प्रशालेच्या शालेय कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button