भारताच्या स्वावलंबनाची आकांक्षा वैश्विकतेला मजबूत करणारी – अविनाश हळबे

सांगोला ( प्रतिनिधी )भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी सर्वस्वी प्रतिकूल परिस्थिती असताना भारतीयांनी कमालीची जिद्द ठेवत शैक्षणिक ,आरोग्य,पर्यावरण,औद्यगिक, संरक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान ,अंतराळ विज्ञान आणि अणूशक्ती विकास यामध्ये केलेली विस्मयकारक प्रगती लक्षात घेता.भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनण्याची आकांक्षा ठेवली त्यातूनच प्रगती झाली. हाच विचार वैश्विकता मजबूत करणारा आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते साहित्यिक अविनाश हळवे यांनी केले. भारतीय संविधान दिन व २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतिप्रित्यर्थ सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मनात देशाभिमान वर्धिष्णू करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ सांगोला कडून आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रांत ३२३४ ड १ माजी प्रांतपाल मार्गदर्शक ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक बिभिषण माने, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते करण्यात आले व कै गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास प्रमुख वक्ते अविनाश हळबे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भारतीय संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.
पुढे बोलताना अविनाश हळवे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भारताने केलेल्या प्रगतीचा चढता आलेख सांगताना दुग्धव्यवसायातील प्रगती, अन्नधान्यातील प्रगती, उद्योगधंद्यातील प्रगती,अंतराळातील प्रगती, या संदर्भात अतिशय अभ्यासपूर्ण माहिती व दाखले देत भारत देश कसा महान आहे हे वेळोवेळी पटवून दिले. त्यामध्ये जगातील शेकडो कंपन्या भारतीयांनी विकत घेतल्याची माहिती, सॅटॅलाइटमधील परिपूर्णतेची माहिती, डॉ. माशेलकर, डॉ.विजय भटकर, रतन टाटा यांच्या कार्याची माहिती व सुपर कॉम्प्युटरची निर्मिती संदर्भातील दिलेली माहिती, विविधतेतून एकता ठेवणारा धर्मनिरपेक्ष देश या संदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना विजूगिषू प्रेरणा देणारी ठरली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले.प्रा.शिवशंकर तटाळे यांनी सूत्रसंचालन केले तर खजिनदार प्रा.ला.नवनाथ बंडगर यांनी आभार प्रदर्शन केले.
विविधतेत एकता ठेवणाऱ्या भारत देशाने अनेक जाती- धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन प्रगती केली आहे. याचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येकाचा हातभार आवश्यक आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा जबाबदार आणि समंजस नागरिक तयार होण्यासाठी तुम्ही आतापासूनच संस्कारित होणे आवश्यक आहे. यातूनच तुम्ही आदर्श नागरिक बनाल व तुमच्या उत्तुंग कार्याने देशाचा विकास होईल आणि भारत देश एक दिवस सर्वोच्च पदावरती जाईल..
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके