महापुरुषांच्या अवमानासंदर्भात सांगोला येथे मोर्चा व रास्ता रोको संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):-महाराष्ट्रात सध्या महापुरुषांचा अवमान वारंवार केला जात आहे. या अवमानाच्या निषेधार्थ समस्त बहुजनांच्यावतीने काल सोमवार दि.5 डिसेंबर 2022 रोजी अवमानकारक वक्तव्य करणार्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.आता महापुरुषांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, अशी घोषणा देत काळे झेंडे दाखवून सकाळी सांगोला शहरातून मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मोर्चाची सुरुवात सांगोला शहरातील महात्मा फुले चौक येथून करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, पंडित जवाहरलाल नेहरु, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत सदर मोर्चाचे पंचायत समिती सांगोला समोर रास्ता रोको मध्ये रुपांतर झाले. यावेळी दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
पुरोगामी भारत देश व महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून राज्यांच्या मोठ्या पदावर कार्यरत असणारे राज्यपाल भगतसिंह कोशारी व प्रमुख पदावर असणारे नेते मंडळी, पदाधिकारी यांनी अखंड भारत देशाचे दैवत बहुजन प्रतिपालक आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले, शिक्षणप्रेमी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानव राष्ट्रपुरूषांच्या बद्दल व समस्त माता भगिनी बदद्ल बेताल वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करणार्या व जाती धर्मामध्ये भाडणे लावणार्या या देशाची कायदा व सुव्यवस्था बिघडवणार्या या देशद्रोही लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
देश आणि राष्ट्रांचे हित पाहणार्या महामानवांनी आपले आयुष्य पणाला लावुन बहुजन समाजाला समान न्याय हक्क अधिकार दिला, त्या महापुरुषाबद्दल असे वारंवार बेताल वक्तव्य करणार्या राजकीय नेतेमंडळी व पदाधिकारी यांच्यावर त्वरीत कठोरात कठोर कारवाई व्हावी.अन्यथा बहुजन समाजाला याही पेक्षा कडक पावले उचलावी लागतील, त्याची संपुर्ण जबादारी ही शासन व प्रशासनाची राहील,असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले, महाराष्ट्रात मागच्या काही महिन्यात काही विचारवृती महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्ये करत आहेत. हे भारत देशाच्या दृष्टीने चुकीचे आहे. सध्या बेरोजगारीचे, शेतकर्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात असताना अशा महत्वाच्या प्रश्नांकडे बगल देवून महापुरुषांचा अवमान केला जात आहे. यापुढील काळात संपूर्ण महाराष्ट्र व भारत देश बंदचे आवाहन करावे लागेल तरच अशा विचारांचा नायनाट होईल. महापुरुषांचा अवमान करणार्यांवर खटला दाखल करावा अशी मागणी करत त्यांनी निषेध व्यक्त केला
युवा नेते डॉ.पियूषदादा साळुंखे पाटील म्हणाले, थोर महापुरुषांचे अवमान करुन महाराष्ट्राची परिस्थिती उध्दवस्त करून टाकली . अशी परिस्थिती करणार्यांचा निषेध करण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागणार आहे. महाराष्ट्रात महत्वाच्या पदावर असतो त्यानी पदाचा मान ठेवावा अशी अपेक्षा केली. थोर महापुरुषांचे अवमान करणार्यांची हकालपट्टी करावी,अशी मागणी करत ही सुरुवात आहे त्यामुळे आमचा अंत बघू नका,असा इशारा देत त्यांनी निषेध व्यक्त केला.
यावेळी बापूसाहेब ठोकळे, तुषार इंगळे, रवींद्र कांबळे, दादासाहेब खडतरे, विनोद रणदिवे, आकाश व्हटे, समीर पाटील, शहाजी गडहिरे, बाबासाहेब बनसोडे, दत्ता टापरे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन निषेध व्यक्त केला.
सदर मोर्चा व रास्ता रोकोप्रसंगी इंजि.रमेश जाधव, अरविंद केदार, अतुल पवार, चौगुले काका, तानाजीकाका पाटील, शिवाजीनाना बनकर, दिपक खटकाळे, महेश नलवडे, समीर पाटील , सुभाष इंगवले, उल्हास धायगुडे, मनोज ढोबळे, प्रताप इंगवले, डॉ.दादा जगताप, अजिंक्य तोडकरी, शाहरुख तांबोळी, अरुण बिले, राजेंद्र पाटील, संभाजी बिले, आप्पासो केदार, आण्णासो केदार, संभाजी पाटील, सतिश वाघ, सुहास होनराव, शेखर गडहिरे, दिपक ऐवळे, अक्षय रुपनर, मल्हार गायकवाड, कौस्तुभ शिंदे, दत्तात्रय घाडगे, अंकुश निमग्रे, शशिकांत गायकवाड, वेदांत इंगवले, इरफान फारुखी, ज्ञानेश्वर बनसोडे, राजेंद्र यादव, यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोश्यारींच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली.
रास्तारोको नंतर तहसीलदार अभिजीत पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्विकारल्यानंतर आपल्या भावना लेखी स्वरुपात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास पोहचविल्या जातील असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.सदर मोर्चा व रास्ता रोको प्रसंगी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस स्टेशनचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.