प्रा. डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांची सोलापूर विद्यापीठाच्या सीनेट पदी नियुक्ती

सांगोलाः डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाच्या स्थायी समितीकडून सीनेटपदी नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल नुकत्याच झालेल्या ३४ व्या विद्यापीठाच्या आधीसभेमध्ये मा. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव श्रीमती योगिनी घारे यांचेमर्फत त्यांचा सिनेट सभागृहात सत्कार करण्यात आला.
डॉ. सूर्यवंशी हे डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे १९९३ पासून वनस्पतीशास्त्र विभागात कार्यरत आहेत. त्यांनी राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावरती ३० पेक्षा जास्त शोधनिबंध सादर व प्रसिद्ध केले आहेत. उच्च शिक्षणात सातत्त्याने नवनवीन प्रयोग ते करीत आले आहेत. वनस्पतीशास्त्र या विषयांचे संपूर्णपणे संगणीकरण असून त्यांची अनेक मान्यवरांनी प्रशंसा केली आहे. त्यांनी वनस्पतीशास्त्र या विषयाची अभ्यासक्रमातील 35 पेक्षा जास्त क्रमिक पुस्तके लिहिली आहेत. महाविद्यालयामार्फत त्यांची पहिल्या तीन्ही मूल्यांकण अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक म्हणून नेमणूक केली होती. वनस्पती शाखाचा व फुलांच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अंदमान निकोबार, नेपाळ, भूतान, सिक्किम, लेह-लदाख, लाहौल-स्पीती, द्रास, कारगिल, इत्यादी ठिकाणी स्वतः वाहन चालवत अभ्यास दौरे केले आहेत व शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांना भ्रमंतीचीही आवड असून, महाराष्ट्रातील बहुतांश गड किल्ल्यांचे ट्रेक केले आहेत. मुलांच्यासाठी पश्चिम घाटामध्ये अनेक जंगल कॅम्पचे नियोजन करून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जंगल निरीक्षणाचे प्रशिक्षण दिले आहे. पक्षी निरीक्षक व सर्पमित्र म्हणूनही ते परिचित आहेत.
ते यूथ हॉस्टेलचे सभासद असून हिमालयामध्ये निसर्ग अभ्यास ट्रेक मध्ये मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली आहे. संगीत शास्त्रामध्ये त्यांना गायनाची व वादनाची आवड असून, पखवाजवादन हा त्यांचा आवडींचा कलाप्रकार आहे, अनेक प्रसिद्ध मान्यवरांच्या मैफिलीमध्ये सहभाग घेतला आहे व साथसंगत केली आहे. शिवाजी व सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सव समितीमध्ये महाविद्यालयाच्यावतीने प्रभावी काम केले आहे. याचबरोबर समाज प्रभोधनामध्ये त्यांचे मोलाचे योगदान असून ते महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती सोलापूर जिल्ह्याचे सचिव होते. सध्या ते मराठी विज्ञान परिषद चे कार्यध्यक्ष, महाराष्ट्र परिवर्तन फाउंडेशन चे खजिनदार, महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे कार्यकारणी सदस्य, सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघाचे खजिनदार आहेत, माणगंगा भ्रमण सेवा या संस्थेचे सचिव असून त्यांच्या समितीचा नुकताच भारत सरकार व राज्य सरकार मार्फत यथोचित सत्कार झाला आहे. एक शिस्तप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल संस्था, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकत्तर कर्मचारी, विद्यार्थी, मित्र, नातेवाईक यांनी यथोचित सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.