मुलींच्या शिक्षणासाठी माता देणार संपूर्ण सहयोग

महूद:-ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी झेलले शेण,दगड,चिखलाचे प्रहार… सावित्रीबाईंनी केला शिक्षणाचा प्रसार…स्त्री शिक्षणाचा पाया रचणार्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने महूद अंतर्गत असलेल्या चव्हाणवाडी- केसकरवस्ती प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या बाल आनंद मेळाव्यात मुलींबरोबरच त्यांच्या मातांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.तसेच आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी संपूर्ण सहयोग देण्याचे मान्य केले.
महूद अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी-केसकरवस्ती येथे बालिका दिनाच्या निमित्ताने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद् घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्या रोहिणी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमास वैशाली केसकर, सुजाता केसकर, रेखा केसकर,शालाबाई नागणे, पूजा नागणे, स्नेहल डुबुले, रूपाली जाधव, सारिका बंडगर, कल्पना चव्हाण, दिपाली सावंत, आस्मा मुलाणी, अनुसया गोसावी, बाळाबाई कावळे, रत्नप्रभा जाधव,शुभांगी यादव, तेजश्री खबाले, यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या मेळाव्यात सुरुवातीला व्यायामाचे महत्त्व सांगून योगासनांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. मुलींनी गीतमंचच्या माध्यमातून बहारदार गीते सादर केली.तर मुलींचे आरोग्य,समाज माध्यमे आणि मोबाईलचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुलींसाठी शिक्षणाचे महत्त्व,उपलब्ध शैक्षणिक सुविधा व भविष्यातील संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यानिमित्ताने आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी आपण सर्वतोपरी सहयोग देऊ असे अभिवचन मातांनी दिले.
या मेळाव्याच्या निमित्ताने मुलींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.तर परिसरातील कर्तृत्ववान महिलांच्या विद्यार्थिनींनी घेतलेल्या मुलाखतींना मोठा प्रतिसाद मिळाला.दुपारच्या सत्रामध्ये मुलींनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. शिवाय मुलींसाठी आयोजित केलेल्या विविध आनंददायी स्पर्धांमध्ये त्यांच्या माताही आनंदाने सहभागी झाल्या होत्या. विविध स्पर्धा मधील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक तानाजी खबाले, धुळा सातपुते, उमेश महाजन, विठ्ठल तांबवे आदींनी परिश्रम घेतले.