श्री.अंबिकादेवी यात्रा भरणार मार्केट यार्ड परिसरात

सांगोला(प्रतिनिधी):-संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असणारी श्री.अंबिकादेवी यात्रा चालूवर्षी जागा उपलब्ध नसल्यामुळे पारंपारिक ठिकाणी न भरविता सांगोला शहरातील मार्केट यार्ड परिसरात भरविण्याचा सर्वांनुमते निर्णय घेण्यात आला आहे.
सांगोला शहराचे ग्रामदैवत श्री.अंबिकादेवी यात्रेस रविवार दि.22 जानेवारी 2023 ते मंगळवार दि.31 जानेवारी या कालावधीत भरणार आहे. यात्रेचे नियोजन व जागेसंदर्भात पाहणी करण्यासाठी पंढरपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.एन.के.मोरे साो हे काल गुरुवार दि.12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता सांगोला येथे आले होते. यावेळी श्री.एन.के.मोरे साो यांनी अंबिकादेवी मंदिरात अंबिकामातेचे दर्शन घेवून प्रत्यक्ष मार्केट यार्ड परिसरात जाऊन जागेची पाहणी केली.
यावेळी तहसीलदार अभिजीत पाटील, मुख्याधिकारी सुधीर गवळी, सहा.पोलीस निरीक्षक नागेश यमगर, मा.नगरसेवक सतिश सावंत यांच्यासह कोर्ट रिसिव्हर अॅड.सारंग वांगीकर, अॅड.संजीव शिंदे, अॅड.राजेंद्र चव्हाण व अॅड.शिवनाथ भस्मे, अॅड.बेहेरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
सांगोला येथे श्री.अंबिकादेवी यात्रा यावर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून त्यासाठी मार्केट यार्ड परिसरात नियोजन करण्यात येणार आहे. यावेळी यात्रा कालावधीत सर्वांना मास्क बंधनकारक करण्यात येणार आहे. दरवर्षी भरणारी यात्रा गेली दोन वर्षे कोरोनामुळे भरली नव्हती. दरम्यान गेल्या 2 ते 3 वर्षात यात्रा भरते त्याठिकाणी खाजगी जागा मालकांनी स्वत:ची घरे, दुकाने उभी केल्याने यावर्षी यात्रेसाठी जागेचा प्रश्न गंभीर निर्माण झाला होता. परंतु आता जागेचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे यात्रेसंदर्भातील नियोजन लवकरात लवकरात करण्यात येणार आहे.