politicalmaharashtrasangola

नीरा देवघर, सांगोला उपसा सिंचन योजनेसह सर्व सिंचन योजना मार्गी लागल्या- खा. रणजितसिंह निंबाळकर; माढा लोकसभा मतदारसंघातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): कृष्णा भीमा स्थिरीकरण, सांगोला उपसा सिंचन योजना, नीरा देवघर, जीहे कठापूर, खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेसह पंढरपूर फलटण रेल्वेचा प्रश्न मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मार्गी लागला आहे. या सिंचन योजनेमुळे माढा लोकसभा मतदारसंघातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचे मत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केले. सांगोला उपसा सिंचन योजनेसाठी आमदार शहाजीबापू पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी देखील पाठपुरावा केला असल्याचे खा. निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत माढा लोकसभा मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नांसह इतर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार रणजितसिंह निंबाळकर, जलसंपदा मंत्री आमदार शहाजीबापू पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या कॅबिनेट बैठकीत नीरा देवघर प्रकल्पाच्या ३२०० कोटी रुपयांचा सुप्रमास मान्यता देण्यात आली आहे.

महत्वकांक्षी कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा प्रस्ताव पुन्हा केंद्र सरकारकडे पाठवून आवश्यक तो निधी राज्य सरकार उपलब्ध करून देईल असा सकारात्मक निर्णय घेण्यात आला. उरमोडी प्रकल्पाच्या बंदिस्त पाईपलाईनच्या कामास तत्वतः मान्यता देण्यात आली. दोन टीएमसीच्या सांगोला उपसा सिंचन योजनेला तत्वतः मान्यता देण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेसाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.  नीरा देवघर धरणाच्या बाष्पीभवनातून शिल्लक राहिलेले प्रत्येकी एक टीएमसी पाणी सांगोला व पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. नीरा देवघर धरणातील ०.९३ टीएमसी पाणी धोम बलकवडी कॅनॉलला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सिना माढा प्रकल्पात बावी तुळशी, परितेवाडी, अंजनगाव गावांचा समावेश करण्यात आला. खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेत मा, धानोरे, कापसेवाडी, जामगांव, हटकरवाडी, बुद्रुकवाडी गावांचा समावेश करण्यात आला. ब्रिटिशकालीन पंढरपूर फलटण रेल्वेच्या डीपीआरला मान्यता देण्यात आली असून राज्य सरकार १३०० कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. फलटण व मोडनिंब येथे ट्रामा केअर सेंटरला मान्यता देण्यात आली आहे. फलटण तालुक्यासाठी ३०० रोहित्र देण्यास मान्यता देण्यात आली. फलटण व मोडनिंब येथे सेशन कोर्टाच्या इमारत बांधण्यासाठी निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. रांजणी ता. माढा तर नीरा नरसिंगपुर या तीर्थक्षेत्राला जोडणारा रस्ता व पुलाच्या कामाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल, सांगोला तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, भाजपचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!