सांगोला तालुकाराजकीय

स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरणासाठी मा.खा.शरदचंद्रजी पवार व ना.देवेंद्र फडणवीस १३ ऑगस्ट रोजी सांगोल्यात

सांगोला(प्रतिनिधी):- स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्या न्यू इंग्लिश स्कुल शैक्षणिक संकुल सांगोला येथील पुर्णाकृती पुतळा अनावरणासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री मा.खा.शरदचंद्रजी पवार व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे दोन्ही दिग्गज नेते रविवार दि.13 ऑगस्ट 2023 रोजी सांगोल्यात येणार असल्याची माहिती डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांनी दिली.

शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख व युवा नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी काल सोमवार दि.17 जुलै रोजी मुंबई येथे खा.शरदचंद्रजी पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून पुतळा अनावरण कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळी ना.देवेंद्र फडणवीस यांचेसोबत डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांनी चारा छावणी प्रलंबित बिले, टेंभू-म्हैसाळ योजनेची रखडलेली कामे, तालुक्यातील पाणी टंचाई या विषयी सकारात्मक चर्चा केली.
दुष्काळी परिस्थितीत पशुधन जगविण्यासाठी सांगोला तालुक्यात छावण्या चालविण्यात आल्या होत्या. त्या चारा छावणीचे 21 कोटी 47 लाख 14 हजार 992 रुपयांचे बिल प्रलंबीत असून हे बिल लवकरात लवकर चारा छावणी मालकांना अदा करावीत अशी मागणी केली. तसेच गेल्या महिन्यापासून सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधव वरुणराजाची वाट पाहत आहे. परंतु वरुणराजाने हुलकावणी दिल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाणी व  चार्‍याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुधन सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी केली असून तालुक्यातील सध्याची भयावह परिस्थिती आणि तीव्र पाणी टंचाई, चार्‍याचा उपलब्धता यासंदर्भात शासन पातळीवर आपणाकडून तातडीने उपाययोजना करुन शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे निवेदनाव्दारे केली असल्याची माहिती डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांनी दिली.

यावेळी खा.शरदचंद्रजी पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व.भाई.गणपतराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचप्रमाणे शेकापच्या मागण्यांवर निश्चितपणे सकारात्मक विचार करुन आपले सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असे ना.देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले असल्याचे डॉक्टर बंधूनी सांगितले. भेटीप्रसंगी कृषीभूषण प्रभाकर चांदणे, प्रा.अशोकराव शिंदे, प्रा.दिपकराव खटकाळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!