अनिलभाऊ इंगवले यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र वी गौरव पुरस्कार जाहीर ; रविवारी पुणे येथे होणार मान्यवरांच्या हस्ते वितरण

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रभक्ती जनविकास संघटना भारत यांच्यावतीने राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष व एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांना नुकताच जाहीर झाला. रविवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी टिळक रोड , पुणे येथील डॉ. नीतू मांडके आय एम ए हाऊस या सभागृहात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी , प्रहार जनशक्ती चे संस्थापक माजी मंत्री बच्चुभाऊ कडू, लातूर विभागीय सहनिबंधक डॉ.ज्योतीताई मेटे, आदर्श गाव संकल्पक सरपंच पद्मश्री डॉ.पोपटराव पवार या मान्यवरांच्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी ट्रिपल महाराष्ट्र केसरी ए सी पी विजय चौधरी, भारत सरकारच्या अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य डॉ. अविनाश सकुंडे, सामर्थ्य जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जगन्नाथ माने पाटील, सेंद्रिय शेती असोसिएशनचे राज्याध्यक्ष कृषी भूषण अंकुश पडवळे , राष्ट्रभक्ती जनविकासचे सुनील मोरे तसेच राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहने इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधील मेडशिंगी बुरलेवाडी सारख्या एका छोट्याशा गावात जन्मलेले अनिल इंगवले हे स्वतः माळकरी असून त्यांच्या कुटुंबात देखील भक्तीची परंपरा आहे. समाजकारण, राजकारण, विविध प्रकारच्या चळवळी व उद्योग व्यवसाय यामध्ये ते गेली दोन तपाहून अधिक काळ सक्रिय असून सुमारे अठरा वर्षापासून ते सहकार व वित्तीय क्षेत्रामध्ये देखील अग्रेसर आहेत. नेहरू युवा मंडळाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तसेच मेडशिंगी गावचे उपसरपंच म्हणून देखील इंगवले यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे. त्यांनी डॉ.बंडोपंत लवटे , जगन्नाथ भगत व सुभाष दिघे यांना सोबत घेऊन सन 2010 साली सूर्योदय उद्योग समूहाची स्थापना केली असून वित्तीय क्षेत्र, दुग्ध व्यवसाय, कृषी पूरक क्षेत्र, कापड व्यवसाय, मोटार्स अशा अनेक उद्योगांच्या माध्यमातून आजवर कित्येक तरुणांना रोजगार उपलब्ध केला असून हजारो कुटुंबांना संस्थांच्या माध्यमातून खूप मोठा आर्थिक हातभार लावलेला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा आवाका देखील खूप मोठा आहे. त्यांना सहकाररत्न, उद्योगरत्न यासारख्या अनेक पुरस्कारांनी यापूर्वी देखील सन्मानित करण्यात आले आहे. सहकाराचा सखोल अभ्यास , वित्तीय क्षेत्रातील उठावदार कार्य व सामाजिक सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.