लायन्समधील सामाजिक बांधिलकी लोकहितासाठी दिशादर्शक -ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके; लायन्स क्लब ऑफ सांगोलाकडून माजी प्रांतपाल सत्कार समारंभ संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) लायन्स क्लबमध्ये प्रत्येकाच्या मनामधील सामाजिक बांधिलकीची भावना सेवाभाव निर्माण करणारी आहे. त्यातूनच अनेक कल्याणकारी कार्यात मोफत नेत्रचिकित्सा व मातीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, अंधासाठी सर्व प्रकारचे सहाय्य, गरजूंना व अपंगांना वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे, शैक्षणिक ,आरोग्यविषयक व सामाजिक सेवाकार्य अशा विधायक कार्याला प्राधान्य दिले जाते. तसेच पर्यावरण रक्षण, युवकांसाठी कार्य, नागरिकत्व व देशभक्तीची जाणीव, गरजूंना मदतीचा हात इत्यादीवरही लक्ष केंद्रित केले जाते.त्यामुळे ही जाणीव लोकहितासाठी दिशादर्शक आहे.असे प्रतिपादन ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले.
लायनिझममध्ये दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात माजी प्रांतपाल यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून माजी प्रांतपाल यांचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो.यानुसार माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचा लायन्स क्लब ऑफ सांगोला कडून अध्यक्ष ला. प्रा.धनाजी चव्हाण यांच्या हस्ते सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे सत्कार संपन्न झाला.या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सचिव म.शं.घोंगडे,प्राचार्य लक्ष्मण जांगळे उपस्थित होते.
पुढे बोलताना ला.प्रा.झपके म्हणाले शैक्षणिक ,राजकीय कार्याबरोबर सामाजिक कार्याचा वसा मला कुटुंबातूनच मिळाला. त्यामुळेच लायन्स क्लब मध्ये सेवाकार्य करता आले. लायन्स मधील रुजलेली लोकशाही, सेवाभाव सामाजिक कार्यासाठी उर्मी देणारा आहे.आज सांगोला लायन्स कडून झालेला नाविन्यपूर्ण सन्मान कायम लक्षात राहील व यापुढेही कायम सत्कार्य करण्यासाठी तो महत्त्वापूर्ण असेल.
या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ सांगोला पदाधिकारी व सदस्य, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजधील प्रशासकीय अधिकारी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन सचिव उन्मेश आटपाडीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन खजिनदार ला.प्रा.नवनाथ बंडगर यांनी केले.
‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले ‘या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे माजी प्रांतपाल मार्गदर्शक आदरणीय ला. प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांचा गेल्या ४५ वर्षातील लायन्स मधील सेवाभाव, त्यांच्याप्रती प्रत्येकाच्या मनामधील असलेला आदरभाव, व सर्वसामान्यांच्या अभ्युदयासाठी लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य पाहता ते लायनिझमधील जगद्गुरुच वाटतात. याच भावनेतून सांगोला क्लब कडून झालेला त्यांचा सन्मानही अनेकांना प्रेरणा देणारा ठरणार आहे.