सांगोला तालुकाक्राईम

मोबाईल आणि दुचाकी चोरी करणार्‍या टोळीचा छडा लावण्यात सांगोला पोलिसांना यश; सांगोला पोलीसांकडून 4 मोटारसायकली व 21 मोबाईल हस्तगत

सांगोला(प्रतिनिधी):-महूद : सांगोला तालुक्यातील आठवडा बाजारातून दुचाकी व मोबाईल चोरणारी टोळी सांगोला पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यात तीन पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चार दुचाकींसह 21 मोबाईल हँडसेट, असा एकूण 5 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. महूदसह सांगोला तालुक्यातील आठवडा बाजारात या चोरट्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले होते.
26 जानेवारी रोजी महूद येथील यश हनुमंत कारंडे यांची दुचाकी चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास मंगळवेढ्याचे पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील व सांगोला पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता. चोरांचा छडा लावण्यासाठी एक स्वंत्र तपास पथक तयार करण्यात आले होते. 22 फेब्रुवारी रोजी बागलवाडी व अचकदाणी (ता. सांगोला) येथील दोन व्यक्ती त्यांच्याकडील कागदपत्रे नसलेल्या दुचाकी कमी किंमतीत विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना खबर्‍यांकडून मिळाली.
त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याकडील विनाक्रमांकाची दुचाकी महूद(ता. सांगोला) येथून चोरी केल्याचे समोर आले. त्यांच्याकडे अधिक तपास केल्यावर इतर दोन साथीदारांना सोबत घेऊन जत, कोल्हापूर, कर्नाटक येथून दुचाकी चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी त्या साथीदारांनाही जेरबंद केले. या गुन्ह्यात तीन संशयितांसह एक अल्पवयीन बालक देखील आहे.
30 जानेवारी 2022 रोजी सांगोला येथील आठवडा बाजारातून शिवणे (ता. सांगोला) येथील तानाजी घाडगे यांचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला होता. मोबाईल चोरणारी महिला पानवन (ता. माण, जि. सातारा) येथील असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पानवन येथे जावून त्या महिलेस ताब्यात घेतले. तिच्याकडून सांगोला तालुक्यातील विविध आठवडा बाजारातून व इतर ठिकाणाहून चोरलेले वेगवेगळ्या कंपनीचे 3 लाख 97 हजार 500 रुपयांचे तब्बल 21 मोबाइल हस्तगत केले. दरम्यान, मोबाईल आणि दुचाकी चोरी करणार्‍या मोठ्या टोळीचा छडा लावण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र राजुलवार, पोलिस हवालदार दत्ता वजाळे, विकास क्षीरसागर, अभिजीत मोहोळकर, बाबासाहेब पाटील, लक्ष्मण वाघमोडे, प्रियंका बनसोडे, अर्चना चव्हाण व सायबर पोलिस ठाण्याचे युसूफ पठाण यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

HTML img Tag    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!