सांगोला येथे आ.रवींद्र धंगेकर यांच्या सत्काराच्या नियोजनाची लोणारी समाज बांधवांची बैठक संपन्न

कोळा (वार्ताहर):-सांगोला तालुक्यातील लोणारी समाज बांधवांच्या वतीने पुणे कसबा विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार रवींद्रभाऊ धंगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोणारी समाजातील सामाजिक, सांस्कृतिक , शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करणार्या श्री.धंगेकर प्रेमी समाज बांधव यांच्या उपस्थितीत गणेश मंगल कार्यालयात बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी बैठकीमध्ये आ.रवींद्र धंगेकर कसबा- पुणे विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये स्व-कर्तुत्वाने व महाविकास विकास आघाडीच्या मदतीने जे घवघवीत यश संपादन केले व सकल लोणारी समाजाला त्यांच्या माध्यमातून जो मान आणि सन्मान मिळवून दिला त्याबद्दल श्री धंगेकर साहेबांचे सांगोला नगरीमध्ये लोणारी समाजाच्या वतीने उत्स्फूर्तपणे स्वागत व सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सदर सत्कार समारंभामध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मंडळींना सन्मानपूर्वक लोणारी समाजाच्या वतीने निमंत्रित करण्यात येणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे नाना पटोले, राष्ट्रवादीचे अजित पवार, शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील व आदित्य उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत.
सदर बैठकीमध्ये एक मताने निमंत्रक म्हणून ज्येष्ठ नेते श्री.बाबा करांडे यांना बैठकीमध्ये स्थापन केलेल्या प्रमुख कमिटीसी विचार विनिमय करून निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते मंडळीशी विचार विनिमय करून संबंधित नेते मंडळींची एकत्रित तारीख व वेळ मिळवण्याचे अधिकार इंजिनिअर उद्योगपती श्री अशोक नरळे-फलटणे व नगरसेवक नवनाथ रानगट यांना सर्वानुमते देण्यात आलेले आहेत. सर्व महाराष्ट्रातून लोणारी समाज बांधवांना सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात येणार आहे. लोणारी समाज बांधव विविध राजकीय पक्षांबरोबर संलग्न रित्या काम करत आहेत. परंतु बैठकीमध्ये सर्वानुमते असे ठरवण्यात आले आहे की पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सकल लोणारी समाज बांधवांनी एकदिलाने आणि एक मुखाने सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामील होण्याची विनंती सर्व समाज बांधवांना करण्यात आली. अधिवेशन चालू असल्याने 27 तारखेपर्यंत तारीख देता येणार नाही असे श्री अशोक नरळे यांच्या माध्यमातून सांगण्यात आले. सांगोला शहरात होणार्या आमदार रवींद्र धंगेकर यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाची तारीख लवकरच समाज बांधवांना कळविण्यात येईल असे शेवटी सांगण्यात आले.