धाडस आणि विश्वास याच्या जोरावरच एल के पी मल्टीस्टेट यशाचे शिखर गाठेल– प्रा. नितीन बानुगडे पाटील; एल के पी मल्टीस्टेट भोसे शाखेचा लोकार्पण सोहळा संपन्न

साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण होत असताना महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन प्रांतांचा निकटचा संबंध आला होता . रयत आणि मावळे यांचा अपार विश्वास तसेच प्रचंड धाडस याच्या जोरावरच छत्रपतींनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य उभा केले. महाराजांचा इतिहास फक्त वाचून आणि ऐकून चालणार नाही तर त्याप्रमाणे आपण आपली वाटचाल केली तर नक्कीच मराठी पाऊल पुढे पडल्याशिवाय राहणार नाही. हाच ऐतिहासिक वारसा नजरे समोर ठेवत या ठिकाणी चेअरमन अनिलभाऊ इंगवले आणि त्यांचे सवंगडी डॉ. बंडोपंत लवटे , जगन्नाथ भगत गुरुजी व सुभाष दिघे गुरुजी यांनी समाजातून खूप मोठा विश्वास संपादन करत व प्रचंड धाडस दाखवत अर्थविश्वातील सहकाराचा यज्ञ प्रज्वलित केलेला आहे . यामुळे एल के पी मल्टीस्टेट ही संस्था निश्चितच यशाचे शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही . तसेच या मल्टीस्टेटच्या माध्यमातून महाराष्ट्र व कर्नाटक अशा दोन राज्यांमध्ये अनेक शाखांच्या माध्यमातून घेत असलेली गरुडभरारी ही कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते व इतिहासाचे अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले.

भोसे तालुका मंगळवेढा येथे एल के पी मल्टीस्टेटच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. शकुन आणि अपशकुन यांच्या फेऱ्यात न अडकता “केल्याने होत आहे रे अधि केलेची पाहिजे “असे सांगत मराठी माणसाला उद्योग आणि व्यवसायामध्ये आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी व त्याचे मन , मेंदू आणि मनगट बळकट करण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून मदतीचा हात देत इतरांसमोर विकासाचा दीपस्तंभ म्हणून केले जाणारे या उद्योग समूहाचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार व्यक्त करत आणि छत्रपती शिवरायांच्या जीवनातील अनेक रोमांचकारी प्रसंग हुबेहूब समोर उभा करत व दैनंदिन जीवनातील कितीतरी मार्मिक दाखले देऊन मौलिक मार्गदर्शन करत बानुगडे पाटील यांनी उपस्थितांना सव्वा तासाहून अधिक काळ मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक तथा मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती तानाजीभाऊ काकडे होते . यावेळी व्यासपीठावर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जयसिंगतात्या पाटील, भोसे गावच्या सरपंच सुनीताताई ढोणे, दामाजी कारखान्याचे संचालक बसवेश्वर पाटील, शिरनांदगी चे सरपंच गुलाबराव थोरबोले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला संस्थेचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी प्रास्ताविकामध्ये एल के पी मल्टीस्टेटचा विस्तार, संस्थेची कार्यपद्धती, ठेवीदारांसाठी असलेल्या आकर्षक योजना आणि विविध प्रकारच्या कर्ज योजना सांगत पुढील ध्येय, धोरणे व दिशा स्पष्ट केली. संस्थेच्या प्रगतीला ज्यांचा ज्यांचा हातभार लागला आहे अशा सर्व ग्राहकांचे ऋण व्यक्त केले. तसेच सांगोला तालुका व सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये सूर्योदय उद्योग समूहाची गेल्या तेरा वर्षातील वाटचाल आणि चढता आलेख स्पष्ट करत सभासद बांधव व ग्राहकाकडून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी भोसे गावचे उद्योजक प्रकाश पाटील बोलताना म्हणाले की दोन राज्य कार्यक्षेत्र असलेल्या एवढ्या मोठ्या मल्टीस्टेट ची शाखा आपण आमच्या भोसे गावामध्ये काढली ही गोष्ट आमच्यासाठी गौरवास्पद आहे. या शाखेमुळे आमच्या गावासह आजूबाजूच्या बारा ते पंधरा गावांतील छोट्या मोठ्या व्यवसायिकांची मोठी सोय झाली असून ही संस्था समृद्ध होण्यासाठी लागेल तितके सहकार्य करण्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. युवक नेते बसवेश्वर पाटील तसेच गुलाबराव थोरबोले यांनी देखील या मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले व त्यांचे संचालक मित्र तसेच सूर्योदय परिवाराची विश्वासार्हता व धडाडीचे कौतुक करत मल्टीस्टेटक्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन, बानगुडे पाटलांचा अंगावर शहारे आणणारा धगधगता विचार, हलग्यांचा कडकडाट, कोल्हापुरी फेट्यांचा साज व कार्यक्रमासाठी जमलेली अलोट गर्दी यामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला असल्याच्या भावना यावेळी अनेकांनी बोलून दाखवल्या. शेवटी आभार सूर्योदय उद्योग समूहाचे सहसंस्थापक जगन्नाथ भगत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एलकेपी मल्टीस्टेट व सूर्योदय अर्बनचे अधिकारी तसेच भोसे शाखेचे शाखा व्यवस्थापक चंदन खांडेकर , बाळासाहेब सूर्यवंशी ,सागर पाटील, दुर्योधन चौगुले ,सखाराम चौगुले ,रविराज पाटील इत्यादींनी परिश्रम घेतले.