सांगोला नगरपरिषदेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचा स्तुत्य उपक्रम; माता रमाई बचत गटाच्या अध्यक्षांची केंद्र शासनाकडून गुजरात दौऱ्यासाठी स्वच्छतादूत म्हणून निवड.
दि.अं.यो.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) ही केंद्र पुरस्कृत योजना सांगोला नगरपरिषद राबवित आहे. सदर योजना ही शहरी दारिद्र्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सन २०१४-१५ पासून कार्यान्वीत झालेली आहे. योजनेच्या माध्यमातून शहरातील दारिद्र्य रेषेखालील महिलांचे जीवनमान उंचविण्याच्या दृष्टीने नगपरिषदस्तरावर महिला बचत गटांची स्थापना करण्यात येते. या अनुषंगाने शहरामध्ये आज १८० पेक्षा जास्त बचत गट कार्यरत आहेत. या बचत गटांमध्ये महिलांचा बचत गट, सफाई कर्मचारी यांचा बचत गट तसेच दिव्यांग बांधवांचे बचत गटांचा समावेश होतो.
केंद्र शासनाने स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या बचत गटातील महिलांकरिता गुजरात येथे स्वच्छता अभियाना अंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण कामाची माहिती मिळण्याच्या हेतूने दि. २७ मार्च ते २९ मार्च दरम्यान गुजरात अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छतादूत म्हुणुन महाराष्ट्रातून १२ महिलांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये सांगोला नगरपरिषदेच्या दि.अं.यो.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या माता रमाई स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा श्रीम. विद्या माणिक बनसोडे यांची निवड करण्यात आलेली आहे. यावेळी डॉ.सुधीर गवळी, मुख्याधिकारी, नगरपरिषद,सांगोला यांच्या हस्ते माता रमाई स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा श्रीम. विद्या माणिक बनसोडे यांचा महाराष्ट्रातून गुजरात दौऱ्यासाठी निवड झालेबाबत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सांगोला नगरपरिषदेचे श्री.विजयकुमार कन्हेरे, कार्यालयीन अधीक्षक, श्री.योगेश गंगाधरे, सहा.प्रकल्प अधिकारी व श्री. बिराप्पा हाके, समुदाय संघटक श्रीम. नैना होवाळ,सचिव हे उपस्थित होते.